मुंबई दि. ०७ — बीड जिल्हयातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे वास्तव भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मांडले होते तेव्हा बीड जिल्हयाची बदनामी होतेय म्हणून गळे काढले गेले आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीच या विषयावर विधानसभेत आक्रमक लक्षवेधी मांडली.आ. प्रकाश सोळंके यांनी तर बीडचा बिहार झालाय, जनतेला सुरक्षा मिळणार की नाही? असा खडा सवाल करत घरचा आहेर दिला.
गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयात गुन्हेगारीत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. वाळू माफिया, गुटखा माफियांनी हैदोस मांडला आहे.अनेकांचा जीवही गेला आहे. कायद्याचा कसलाही धाक गुन्हेगारांवर राहिला नाही. बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेचे भीषण वास्तव पंकजाताई मुंडे यांनी मांडले होते, त्यावेळी पालकमंत्र्यांना बीडची बदनामी होत असल्याचा साक्षात्कार झाला पण आता त्यांचेच आमदार याविरुद्ध आवाज उठवू लागलेत. आज विधानसभेत प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे यांनी तर जिल्हयात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत याचा पाढा वाचत पोलिस खात्यातील भ्रष्टाचार, स्वतः एसपी हप्ता गोळा करतात, असा आरोप केला. खोटे गुन्हे दाखल करणे, निष्पाप नागरिकांचे बळी, वाळू माफियांचा हैदोस हे सर्व पाहता पोलिस अधीक्षकाची वरिष्ठांकडून चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली.
गुन्हेगारांना पाठिंबा कुणाचा ?
बीड जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण? हे सर्व कुणाच्या आशीर्वादाने चालते हे वेगळं सांगण्याची गरज नाही. राज्यात सरकार राष्ट्रवादीचे, पालकमंत्री राष्ट्रवादीचे, सहापैकी चार आमदारही त्यांचेच मग तरीही गुन्हेगारी वाढतच आहे. आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी वास्तव मांडले तर बीडची बदनामी होतेय म्हणून टिका केली जाते मग आता पालकमंत्र्यांचेच आमदार भर सभागृहात यावर उघडपणे बोलतात हे काय? असा सवाल जिल्हा भाजपने केला आहे.
••••