कडा, दि.28 (लोकाशा न्युज)ः- पल्स पोलिओ दिनानिमित्त रविवारी आरोग्य विभागाने केलेल्या उत्कृष्ठ नियोजनाच्या माध्यमातून 93 टक्के मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिका-यांसह आरोग्य कर्मचा-यांनी जोखीमग्रस्त भागासह वाडीवस्ती, झोपडपट्टी, वीटभट्टी, बसस्थानक इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन 0 ते 5 वयोगटातील 19 हजार 931 लाभार्थीं बालकांपैकी 18 हजार 495 बालकांना पोलिओचा डोस पाजून लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री शिंदे यांनी दिली आहे.
आष्टी तालुक्यात आरोग्य विभागाकडून पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ठ नियोजन करण्यात आले होते. आष्टी तालुक्यातील कडा, धामणगाव, खुंटेफळ, सुलेमान देवळा, टाकळसिंग या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध ठिकाणी नेमलल्या एकुण 232 बुथवर 0 ते 5 वयोगटातील एकूण 19 हजार 931 लाभार्थीं बालकांपैकी 18 हजार 495 लाभार्थी बालकांना पोलिओ डोस पाजून आष्टी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 93 टक्के लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आली आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी राबविण्यासाठी येथे 49 सुपरवायझरची ठिकठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वंयसेविका, अंगणवाडी ताईसह स्वंयसेवक नर्सिंग स्कूल विद्यार्थींनी आदींचा सहभाग होता. आरोग्य यंत्रणेने जोखीमग्रस्त भागासह वाडीवस्ती, झोपडपट्टी, वीटभट्टी, बसस्थानक इत्यादी ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देऊन रविवारची लसीकरण मोहीम यशस्वी केली आहे. या मोहिमेंतर्गत उर्वरित वंचित बालकांचा शोध घेऊन
आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन उर्वरित वंचित बालकांचे लसीकरण करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री शिंदे यांनी सांगीतले.
चौकट
आष्टीत प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण
कडा 3274
धामणगाव 4251
खुंटेफळ 2984
सु.देवळा 2675
टाकळसिंग 5311
एकूण 18495
चौकट
वंचित बालकासाठी आठवड्यातील तीन दिवस- डॉ. मोरे
पल्स पोलिओ मोहिमेपासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी आठवड्यातील मंगळवार, बुधवार अन् गुरुवार या तीन दिवस आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन पोलिओचा डोस देणार आहेत, या पोलिओ डोसपासून कुणीच वंचित राहणार नाही. यासाठी आपल्या दारी येणार्या प्रत्येक आरोग्य कर्मचार्यांना नागरीकांनी सहकार्य करावे असे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी सांगितले.