Uncategorized

बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलवा,पंकजाताई मुंडे यांचे गृहमंत्री, पोलिस महानिरीक्षकांना पत्र,गुन्हेगारीच्या वाढत्या घटना चिंतेची बाब ; गंभीर दखल घेण्याची गरज

बीड ।दिनांक २८।
जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून पोलिसांचा कसलाही धाक गुन्हेगारांवर राहिला नाही. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. या घटनांमुळे सर्व सामान्य नागरिकांत भीती निर्माण झाली असून याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे, त्यासाठी फक्त बीडच्या विषयावर विशेष बैठक बोलवावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी गृहमंत्री, गृह राज्यमंत्री आणि विशेष पोलिस महानिरीक्षक यांना पत्र पाठवून केली आहे.

गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्याला कारणही तसेच आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना जिल्हयात मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार, खंडणी वसुली, तलवारी, रिव्हॉल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. बीड, परळी, अंबेजोगाई, माजलगांव, गेवराई सह सर्वच तालुक्यात गुन्हेगारांनी हैदोस मांडला आहे. पोलिसांचा कसलाही धाक अथवा नियंत्रण राहिले नाही. जिल्हयात पोलिस यंत्रणा आहे की नाही असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे असे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.

स्पेशल बैठक घ्या

गुन्हेगारीच्या वाढत्या घटना अतिशय चिंताजनक बाब बनली आहेत, अशा घटना गंभीरतेने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ बीडच्या कायदा-सुव्यवस्था विषयावर स्वतंत्र व विशेष बैठक घेऊन गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत आणि परिस्थिती नियंत्रणात आणून सर्व सामान्य नागरिकांच्या मनातील भिती दूर करावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!