राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकारण हे तापलेले आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका याआधी कुणी घेतली नव्हती असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळे एका वृत्तवाहिनीशी अटकेविषयी बोलताना म्हणाल्या की, ‘ते इतका अतिरेक करतील हे आश्चर्यकारक होते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतकी टोकाची भूमिका यापूर्वी कुणी घेतली नव्हती. भाजपमधील काही लोक सातत्याने ट्वीट करत होते की 15 दिवसांनी अटक होईल आणि छापे टाकले जातील. हे आता खरे ठरले आहे. कारण ईडी आणि भाजप एकच आहे असा अर्थ आता यामधून निघतो.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. सत्य नकीच जिंकेल. लोकांना त्रास द्यायचा, भीती दाखवायची असा हा प्रयोग भाजपकडून केला जात आहे. मात्र आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकलेला नाही आणि झुकणारही नाही. आम्ही पूर्ण ताकदीने नवाब मलिकांसोबत आहोत. तसेच मी अमित शहांना प्रांजळपणे विचारणार आहे की, जेव्हा पेपर फुटतो तेव्हा आपण कायदेशीर कारवाई करतो. मात्र ईडीचा पेपर फुटला तर न्याय कोणाकडे मागायचा? ‘ असा सवाल देखील सुळेंनी केला आहे.