परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे मालेवाडी रेल्वे क्रॉसिंग गेटवर ओव्हर ब्रीज करण्यात यावे या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक गुप्ता यांची स्वतंत्र रेल्वे अडवून मागणीचे निवेदन दिले. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेवरून गुप्ता यांनी जागेची पाहणी करून ओव्हर ब्रीजचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
मालेवाडी रेल्वे क्रॉसिंग गेट आहे आणि यावर नागरीकांची वर्दळ जास्त आहे. मालेवाडी, तांडा, वनवासवाडी, हाळम, हेळंब आदी गावचे नागरीक भाजीपाला विक्रीसाठी, दुध देण्यासाठी, दवाखाना आणि इतर कामांसाठी परळीला येतात. या मार्गावर रेल्वेच्या फेर्याही जास्त आहेत. ओव्हर ब्रीज नसल्यामुळे अपघाताची शक्यता असते. काही वर्षांपूर्वी येथे मोठा अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाला होता. अशा अपघाताच्या घटना घडू नयेत म्हणून येथे ओव्हर ब्रीज करण्याची नागरीकांची मागणी आहे. यासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आग्रह धरला आहे.
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक गुप्ता नांदेड येथुन हैदराबादकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने मालेवाडीचे सरपंच भूराज बदने यांनी त्यांचा वेळ घेऊन आज मंगळवारी (दि. 22) सकाळी 9.30 वाजता त्यांची स्वतंत्र रेल्वे मालेवाडी आणि परिसरातील नागरिकांनी रेल्वे क्रॉसिंग गेट येथे थांबवुन आपल्या व्यथा मांडल्या आणि परिस्थिती दाखवली. यावेळी गुप्ता यांनी जागेची पाहणी करून सर्व माहिती घेतली. मालेवाडी रेल्वे क्रॉसिंग गेट येथील ओव्हर ब्रीजचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी मालेवाडीचे सरपंच भूराज बदने, येळबंचे सरपंच मोहन होळंबे, आदिनाथ बदने, धोंडिबा गुट्टे, सोमनाथ पोटभरे, रामकिशन बदने, गंगाधर बदने, संजय कसबे, प्रभाकर बदने, बाबासाहेब बदने, भारत आंधळे, भागवत बदने, एकनाथ आघाव, बाळू आघाव, रमेश राठोड, विकास राठोड, भगवान राठोड, धमपाल राजभोज, मित्रपाल कसबे, भरत आंधळे, मारोती राठोड, संदीपान कसबे, बाळासाहेब बदने, प्रदीप बदने, बाळू मुंडे इतर गावकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.