बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : मागील वीस वर्षापासून बीड शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अविरत व अखंड शिवजयंती साजरी करण्यात येते. या शिवजयंतीच्या माध्यमातून बीड शहरातील नागरिकांना विविध संस्कृतिक कला दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वी अनेक राज्यातून आलेल्या कलाकारांनी त्यांची सांस्कृतिक कला व तेथील चित्तथरारक मैदानी खेळ बीड शहरातील जनतेला दाखवले होते.
यंदाची शिवजयंती ही अविस्मरणीय ठरणार आहे व त्यामागचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या काही निवडक प्रसंगांना या लेझर शो च्या माध्यमातून दाखवले जाणार आहे व अशा प्रकारचा लेझर शो होण्याची ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिलीच वेळ आहे. या लेझर शो बरोबरच चारशे कलाकारांचे झांज पथक देखील आपल्या पारंपारिक वाद्यांच्या माध्यमातून आपली कला सादर करनार आहेत. आजवर केवळ युट्युब आणि टीव्हीवर बाईक स्टंट आपण पाहिले होते ते बाईक स्टंट आता बीडच्या जनतेला त्यांच्या डोळ्यांनी पाहता येणार आहेत. गाडीवरील विविध प्रकारचे स्टंट करत हे कलाकार बीडच्या जनतेला आपली कला सादर करणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झांज पथक व लाईट एअर शो हा देखील प्रमुख आकर्षणाचा उपक्रम असणार आहे. आज दि.19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सायंकाळी सहा वाजता वरील सर्व कलाप्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर पार पडणार आहेत. तरी बीड शहरातील तमाम नागरिकांनी या सांस्कृतिक व चित्तथरारक कार्यक्रमांना शासनाने सांगितलेल्या कोरोना नियमांचे पालन करत आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी केले आहे.
चौकट
महापुजेला जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांची राहणार उपस्थिती
दि.19 फेब्रुवारी रोजी सुर्योदया बरोबर सकाळी 7 वाजता शासकीय महापुजा होणार आहे. या शासकीय महापुजेला बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांच्यासह प्रशासनातील अधिकार्यांची उपस्थिती राहिल. दरवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते शासकीय महापुजा केली जाते.