बीड ।दिनांक १६।
बीड जिल्हयात मुलींचा जन्मदर अत्यंत कमी होत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी च्या सदस्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुलींना नाकारले जात असल्याने जिल्हयात पूर्वीसारखीच स्थिती निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आताच्या कारभारावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही असे सांगत मुलींचा जन्मदर पुन्हा वाढविण्यासाठी प्रबोधन, जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाटोदा तालुक्यात हजार मुलांमागे केवळ ७६४ मुलींचा जन्म झाला आहे. कोव्हिड काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टाहास केल्याने ही भयानक स्थिती उद्भवली असल्याचे पीसीपीएनडीटी च्या अशासकीय सदस्या डॉ.आशा मिरगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावर बोलतांना पंकजाताई मुंडे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
पंकजाताई म्हणाल्या, २००९ साली जेव्हा मी राजकारणात आले, तेव्हा जिल्हयात मुलींचा जन्मदर राज्यात सर्वात कमी होता. या गोष्टीविषयी मनात तीव्र दुःख बाळगून यावर एनजीओ च्या माध्यमातून मी खूप काम केलं. जेव्हा महिला बालविकास मंत्री आणि जिल्हयाची पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली तेव्हा मी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी पहिली योजना जाहीर केली आणि याचा चांगला परिणाम होऊन जिल्हयात मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ९६१ मुली असा झाला होता. जन्मदराचे अत्यल्प प्रमाण ज्या ठिकाणाहून सुरू झाले, पुन्हा त्याच ठिकाणी नेऊन ठेवण्याचे काम आताच्या कारभारामुळे होत आहे, याचा मी तीव्र निषेध आणि नापसंती व्यक्त करते.
पुन्हा जनजागृती सुरू करा
बीड जिल्हयात गेल्या दोन वर्षांत पीसीपीएनडीटी ॲक्टचे व्यवस्थित पालन न झाल्याने मुलींचा जन्मदर घटला असल्याचे यावरून दिसत आहे. याचा अर्थ मुलींना नाकारले जात आहे. कुठेतरी अशा घटना घडत आहेत आणि यावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही. जिल्हावासियांना मी आवाहन करते की, जसे आपण ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेला खूप छान प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद पुन्हा द्या. प्रबोधन, जनजागृतीमध्ये सर्वांनी सहभाग घ्या, जिल्हयाचे हे चित्र पुन्हा दिसू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा असे आवाहन केले.
••••