केज ।दिनांक २५।
विकास काम करताना कोणतं गांव कोणत्या पक्षाचं हे पाहिलं नाही, मी कामे करताना भेदभाव केला नाही. मात्र, आताचे पालकमंत्री भेदभाव करतात. आम्ही शुन्याने गुणणारी कामं करणारी नाहीत असा घणाघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केला. लक्ष्मी हरवलीय म्हणून बीड जिल्हयाला वाईट दिवस आलेत असं सांगतानाच मला तुमची कामे करण्यासाठी सत्तेची गरज नाही तुमचा आशीर्वाद हा मला मंत्रीपदापेक्षा खूप मोठा आहे असेही त्या म्हणाल्या.
केज पंचायत समितीच्या आठ कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व कर्मचारी निवासस्थानाचे लोकार्पण पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज कोरोनाचे सर्व नियम पाळून मोठया थाटात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी जिल्हय़ातील सर्व पंचायत समित्यांना नवीन इमारतीसाठी मोठा निधी दिला होता, त्याचेच लोकार्पण आज झाले. आ. नमिता मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, पं.स. सभापती परिमला घुले, विष्णू घुले, उप सभापती ऋषीकेश आडसकर, संतोष हंगे, संदीप पाटील, उषाताई मुंडे, योगिनी थोरात, विजयकांत मुंडे, अशोक लोढा, भरत काळे आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, मीडियाला विनंती आहे, एकदा लोकांमध्ये जाऊन विचारा. मी जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा खूप काही केले. माझ्या वडिलांचे ऋण उतरवण्याचे काम केले. मात्र मागच्या पाच वर्षात स्थिती उलट झाली. हा जनतेसाठी मोठा धडा आहे. आपल्या जिल्ह्यातील लक्ष्मी हरवली आहे. म्हणून बीड जिल्ह्याला वाईट दिवस आले आहेत. शेतकरी म्हणतात विमा मिळाला नाही, तेव्हा मला वाईट वाटते. मी पालकमंत्री असते तर अधिकाऱ्यांचे कान धरले असते. शेतकऱ्यांचे काम आधी केले असते. मी विकास करताना कोणते गाव कुठल्या पक्षाचे आहे, हे पाहिले नाही. मात्र सध्याच्या पालकमंत्र्यांनी भेदभाव केला. बीड जिल्ह्यातील राजकारणी कंत्राटदार झाले आहेत. मी बारामतीच्या पंचायत समितीला निधी दिला होता, मात्र भेदभाव कधीही केला नाही.
..त्यांना आयत्या पीठावर रेघोटया ओढण्याची सवय
रेल्वेला निधी दिला म्हणून बढाया मारता. पण हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष तरतूद करून मंजूर केला आहे. तुमचं सरकार राज्यात होतं त्यावेळेस जिल्हयाला निधी का दिला नाही. आयत्या पिठावर रेघोटया ओढण्याची सवय यांना लागली आहे अशी टिका त्यांनी केली. नगरपंचायत निवडणुकीत आमचा विजय नाही मात्र विरोधकांचा पराभव मोठा आहे असेही त्या म्हणाल्या.
सामान्य जनतेची लूट पाहवत नाही ; रस्त्यावर उतरून आवाज उठवू
सुरुवातीला आम्ही दोन वर्ष शांत बसलो होतो. राजकारण नको, नवीन आहात म्हणून कुणावर टीकाटिप्पणी केली नाही. मी काम केली,कसलीही अपेक्षा केली नाही, मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार असल्याची भूमिका त्यांनी बोलून दाखवली. आम्ही गप्प बसणार नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी आलेलं सरकार आहे, लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवूं. असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या. आम्ही पुढच्या निवडणुका देखील जिंकू जनता आमच्या पाठिशी आहे असेही त्यांनी सांगितले.
••••