बीड, दि. 29 : चर्हाटा फाटा परिसरातील पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी काल रात्री धाड टाकली आहे. काही वर्तमानपत्रांनी कोणती ही शहनिशा न करता ऐकिव माहीतच्या आधारे या पत्ता क्लब धाड प्रकरणात माझे नाव गोवण्याचा प्रयत्न केला आहे. या क्लबशी माझा संबंध नसतानाही नाव आल्याने विनाकारण माझी बदनामी होत आहे. सदरील जागा मदन मस्के यांच्या मालकीची असून त्यांनी इतरांना भाडे तत्वावर दिलेली आहे. संबंधित भाडेकरूने रितसर जिल्हाधिकारी कार्यालय करमणूक विभागा मार्फत सार्वजनिक मनोरंजन प्लेइंग कार्ड करिता परवाना काढलेला आहे. सदरील मनोरंजन पत्ता क्लब हा माझा नसून भाडेकरूनी जागा भाड्याने घेऊन टाकलेला आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे पोलीस प्रशासनासमोर मांडलेली आहेत. या कागदपत्रात कुठेही माझ्या नावाचा उल्लेख अथवा संबंध नाही. याची पडताळणी पोलिस प्रशासनाने केलेली आहे. कृपया अर्धवट माहितीच्या आधारावर पत्ता क्लबच्या संदर्भातील कोणत्याही बातमीमध्ये माझे नाव गोवण्यात येऊ नये अशी आग्रहाची विनंती सर्व वर्तमानपत्र व प्रसिद्धी माध्यमांना करत आहे. बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने चालू केलेली अवैध धंद्या विरोधात सुरु केलेली धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे.
परंतु ही मोहीम राबवत असताना वैध व अवैध धंद्याची पूर्ण माहिती घेऊनच कारवाई करणे उचित होईल. जिल्ह्यात अनेक प्रकारचे अवैद्य धंदे चालू असून सर्व धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेले पाऊल महत्वाचे ठरणार आहे. पोलिस प्रशासनाच्या या मोहिमेला पूर्ण समर्थन आहे. अवैध धंद्या विरुद्धची मोहीम अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी आमचे पोलिस प्रशासनाला सहकार्य असेल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी म्हटले आहे.