परळी । दि.२८ ।
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या कमल सखी मंच या आगळ्यावेगळ्या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.परळी शहरातील महिला कमल सखी मंचशी मोठ्या प्रमाणात जोडल्या जात असून सदस्य नोंदणीसाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या भेटीने महिलांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले.
परळी शहरातील महिलांशी असलेला ऋणानुबंध वृद्धिंगत व्हावा व त्यांच्याशी असलेल्या संवादाला सुलभ आणि प्रभावी माध्यम मिळावे म्हणून कमल सखी मंचची स्थापना करण्यात आली आहे.या माध्यमातून महिलांशी संवाद वाढेल,त्यांच्या अडचणी समजतील आणि त्या सोडविता येतील,तसेच विचारांची देवाणघेवाण होईल या हेतूसह राजकीय परिघाबाहेर असलेला स्नेह जोपासता येईल असे खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या.
शहरातील उखळवेस,फुले चौक,गणेशपार भागातील महिलांच्या भेटी घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी कमल सखी मंचच्या सदस्यांची नोंदणी केली.यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधला, पंकजाताई आणि प्रितमताईंशी कमल सखी मंचच्या माध्यमातून संपर्क वाढल्याने व कौटुंबिक, सामाजिक विषयांवर चर्चा होत असल्याने आनंद झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.यावेळी सुचेता पोखरकर,योगेश पांडकर यांच्यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
•••••