बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : खरीप 2021 च्या विम्याचे 360 कोटी जिल्ह्यात वाटप होणार असल्याचे विमा कंपनीकडून सांगितले जात आहे. त्यानुसार विमा वाटपाची प्रक्रियाही सुरू आहे. मात्र आपल्या मंडळात कोणत्या पीकाला किती पीक विमा आला, हेच समजायला तयार नाही, पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकर्यांना पुर्णपणे अंधारात ठेवले आहे, असे असतानाही संपूर्ण जिल्हा प्रशासन मुग गिळून गप्प आहे, काही तक्रार असेल तर तात्काळ विमा कंपनीला किंवा कृषी अधिक्षक कार्यालयाला कळवा, असे आवाहन करण्यात आलेले आहे, मात्र याठिकाणी आलेल्या एकाही शेतकर्याचे समाधान होत नाही, प्रशासनासह विमा कंपनी शेतकर्यांना केवळ वेढ्यात काढत आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी याकडे तात्काळ लक्ष देवून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
खरीप 2020 च्या विम्यापासून जिल्ह्यातील लाखो शेतकर्यांना वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे 2021 चा तरी विमा पदरात पडणार का? असा प्रश्न जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्यांना पडलेला आहे. यादरम्यान बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना 360 कोटी रूपये मंजूर केल्याचे विमा कंपनीकडून सांगितले जात आहे. मात्र या विम्याचे पैसे काही शेतकर्यांना पडले आहेत तर काही शेतकर्यांना अद्याप ते पडलेले नाहीत, परिणामी शेतकर्यांना अंधरात ठेवून विमा कंपनी काम करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कंपनीच्या अशा वागण्याला कृषी कार्यालयाचाही स्वखुशीने पाठींबा असल्याचे पहायला मिळत आहे. असे नसते तर जिल्हा प्रशासनाने स्वत: पुढाकार घेवून विमा कंपनीला मंडळनिहाय कोणत्या पीकाला किती पीक विमा आला हे जाहीर केले असते. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून जिल्हाधिकार्यांनी शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हाभरातून केली जात आहे.
फोन न उचलण्याची
विमा कंपनीला अलर्जी
विमा कंपनीच्या कार्यालयात दररोज चकरा मारून शेतकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे कामाच्या नावावर पीक विमा कंपनीतील अधिकारी कर्मचारी फोनच घेत नाहीत. यामुळे अनेक शेतकर्यांची गैरसोय होत आहे.