बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील नेकनुरपासुन अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैतागवाडी गावातील पती-पत्नीने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड तालुक्यातील वैतागवाडी येथील राजेश जगदाळे (वय-27 वर्षे) आणि दिपाली डिसले वय-24 वर्षे यांचा विवाह गेल्या 11 महिन्यांपूर्वी गावातच झाला होता. यानंतर त्यांचा संसार सुरू झाला काही महिन्यात घरात आणखी एका नव्या पाहुण्याचे आगमन देखील होणार होते. परंतू गुरूवारी दि. 16 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 2:15 च्या दरम्यान वैतागवाडी येथील राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिपाली जगदाळे हिचा मृतदेह घरातील बेडवर पडलेला होता तर राजेश जगदाळे हा घरातील लोखंडी आडुला गळफास लावलेल्या अवस्थेत होता.
यामुळे यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. परंतु पी.एम रिपोर्ट आणि पोलिसांच्या अंतीम तपासानंतरच याचे कारण आणि स्पष्टता समोर येईल. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलिस स्टेशनचे पी.एस.आय विलास जाधव, परमेश्वर सानप, प्रशांत क्षीरसागर हे घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची बातमी पसरताच परिसरातील शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले होते. या दरम्यान प्रत्येकजण या घटनेने हळहळ व्यक्त करताना दिसून येत आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर येथील रुग्णालयात पाठवले असून रूग्णालयात देखील नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हि घटना अतिशय धक्कादायक असुन नातेवाईकांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा आहे.