Uncategorized

लोकनेत्याच्या अभिवादनासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांची गोपीनाथ गडावर रिघ ! गोपीनाथ गड गांवा गांवात, शेतमजूर, कष्टकरी माणसांपर्यंत घेऊन जा – पंकजाताई मुंडे यांचे आवाहन, गोपीनाथ गड केवळ वास्तू नाही तर विचार आहे,पंकजाताई मुंडे, खा. प्रितमताई मुंडे यांनी स्वतः केले रक्तदान ; वैद्यनाथच्या गळीत हंगामासही केली सुरवात

परळी ।दिनांक १२।
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आयुष्यभर वंचित, गोरगरीब जनतेची सेवा केली, त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा मी पुढे घेऊन जात आहे. गोपीनाथ गड ही केवळ वास्तू अथवा वस्तू नाही तर तो एक विचार आहे असे सांगत गोपीनाथ गड गांवा-गांवात, शेतमजूर, कष्टकरी माणसांपर्यंत घेऊन जा, त्यांची सेवा करा, आजचा दिवस त्यासाठीच समर्पित आहे अशा आवाहन वजा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून गोपीनाथ गडावर आज कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम न करता कष्टकरी, सामान्य माणसाची सेवा करण्याचा संकल्प पंकजाताई मुंडे यांनी जाहीर केला होता.

लोकनेत्याच्या जयंतीचे औचित्य साधून पंकजाताई मुंडे यांनी सकाळी ११.३० वा. वैद्यनाथ साखर कारखान्यात गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून २१ व्या गळित हंगामाचा शुभारंभ केला, त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच यानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात स्वतः सहभाग घेऊन त्यांनी व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी रक्तदान केले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना त्या म्हणाल्या की,
आजच्या दिवशी एका सामान्य गरीबाच्या कुटुंबात मुंडे साहेबांच्या रूपाने राजा जन्माला आला.
आजचा दिवस कष्टक-यांच्या सेवेसाठी समर्पित केला आहे. आतापर्यंत गडावर मोठ मोठे नेते येऊन गेले, अगदी सर्वच पक्षाचे नेते आले, त्यांचा वसा आणि वारसा चालवण्या आठी आजचा दिवस आहे. मुंडे साहेब जाऊन सात वर्षे झाली पण अजुनही लोकांचे प्रेम कायम आहे. आपलं नातंही तसं अद्भूत आहे, याचा दुवा मुंडे साहेब आहेत, त्यांच्या विचाराशी मी कधीही प्रतारणा करणार नाही. गोपीनाथ गड केवळ वास्तू नाही तर विचार आहे, त्यामुळे गोपीनाथ गड गावा गावात न्या, शेतमजूर, कष्टकरी पर्यंत न्या..सर्व सामान्य लोकांत न्या, गरीबांची सेवा करून पांग फेडा असं आवाहन त्यांनी केलं.

क्षणचित्र

• जयंतीनिमित्त मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांची रिघ

• गोपीनाथ गडावर आकर्षक विद्युत रोषणाई ; विविध आकर्षक फुलांनी समाधीची सजावट

• गोपीनाथ गडावर आयोजित रक्तदान शिबीरात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले तसेच कोविड लसीकरणही यावेळी करण्यात आले.

• स्थानिक कलाकारांनी टाळ, मृदंगाच्या गजरात भजन, किर्तन, भारूड आदी कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकले. शाहीरांनी मुंडे साहेबांच्या जीवनावर पोवाडा सादर करून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले.

• आज गडावर माजी मंत्री आ. महादेव जानकर, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, आ. तुषार राठोड, आ. रत्नाकर गुट्टे, आ. सुरेश धस, आ. मोनिका राजळे,
आ. राजेश पवार, भटके विमुक्त आघाडीचे नरेंद्र पवार, महिला मोर्चाच्या उमाताई खापरे, माजी आमदार आर टी देशमुख, रमेश आडसकर, मोहन जगताप, अक्षय मुंदडा, फुलचंद कराड, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष विनोद सामत, ह.भ.प. राधाताई सानप, रमेश कराड आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले.

• सातारा, लोणार, बुलढाणा आदी ठिकाणांहून आलेल्या मशाल रॅली, दिंड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!