Uncategorized

आरोग्य विभाग भरतीचा पेपर मुंबईतून फुटला,बीडमधील घोटाळेबाजांनी दिलेल्या कबूलीनंतर पुणे पोलिसांनी आरोग्य सह संचालकाला केली अटक


पुणे : आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य अधिकार्‍यासह पाच जणांना अटक केली असताना या प्रकरणाचे मुंबई कनेक्शन उघडकीस आले आहे. आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात आरोग्य संचालनालयातील सह संचालक महेश बोटले याला पुणे सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अधिकार्‍याकडूनच हा पेपर फुटल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात यापूर्वी 11 जाणांना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुण्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.
मुंबईतील आरोग्य विभागातील सह संचालक महेश बोटले असे ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. बुधवारी सकाळी बटोले याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. बोटले यांच्याकडे सह संचालक पदाचा अतिरिक्त कार्याभार असून ते मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत. पेपर फुटी प्रकरणात महेश बोटले यांचा सहभाग आढळून आल्याने पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. बटोले हे या समितीत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. प्रशांत बडगिरे याला मंगळवारी अटक केल्यानंतर सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी त्याची चौकशी केली. त्यातून या पेपरफुटीसंबंधी अनेक बाबी पुढे आल्या आहेत. त्यातूनच बडगिरे याने महेश बोटले याच्याकडून पेपर मिळाल्याची माहिती दिली. याप्रकरणी सह संचालक महेश बोटले याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लातूर येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याने आपल्याला बोटले याच्याकडून पेपर मिळाला असल्याची कबुली दिल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

आतापर्यंत 12 जणांना अटक
सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय 50, रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, जि. बीड) डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय 36, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, जि. बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय 36, रा. तितरवणे, ता. शिरूर कासार, जि. बीड), शाम महादू म्हस्के (वय 38 ,रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (वय 51, रा. शामनगर, जि. बीड) यांना मंगळवारी (दि.7) अटक केली. यापूर्वी अनिल गायकवाड, विजय मुर्‍हाडे, प्रकाश मिसाळ, संदीप भुतेकर, बबन मुंढे, सुरेश जगताप यांना अटक केली आहे, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!