धारदार शस्त्राने गळा चिरून व शरीरावर इतर ठिकाणी शास्त्राचे वार करत एका 35 ते 40 वर्षीय अज्ञात इसमाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. सिरसाळा जवळील बीड रस्त्याच्या उत्तर बाजूला असलेल्या वांगी तलावात दोरीने पाय बांधलेला मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 1 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास सिरसाळा- बीड रस्त्यावर उत्तर बाजुला असलेल्या वांगी तलावात 35 ते 40 वर्षीय इसमाचे प्रेत आढळून आले. हा मृतदेह काढला असताता या मृत इसमाचे दोन्ही पाय घोट्याजवळ बांधून तलावात फेकल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्याचप्रमाणे मृत इसमाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार असल्याचेही दिसून आले आहे. यामध्ये कानाच्या डाव्या बाजूस शस्त्राचा वार असून धारदार शस्त्राने गळा चिरण्यात आल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पोना तुषार गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या प्रकरणाचा तपास सपोनि एकशिंगे हे करीत आहेत.