अंबाजोगाई, दि. 2 (लोकाशा न्यूज) : केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणार्या पंतप्रधान कुसुम सौर पंप ऊर्जा योजना बीड जिल्ह्यातील अवघ्या 443 गावात सुरू करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित गावातील हजारो शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची कैफियत केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली होती आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु केला होता. अखेर आ. मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 1,371 गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात केंद्र सरकारतर्फे सौर पंपासाठी प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना महाउर्जा (मेडा) तर्फे सुरू झाली आहे. या योजनेत बीड जिल्ह्यातील फक्त 443 गावे समाविष्ट करण्यात आली होती. एप्रिल 2018 पूर्वी भरलेल्या शेतीपंपाची एचव्हीडीएसमध्ये कामे मंजूर आहेत. एप्रिल 2018 पूर्वीच शेती पंपासाठी कोटेशन भरलेल्यांना एक मोटार एक डीपीचे जवळपास एक हजार शेतकर्यांचे काम अद्यापही पेंडिंग आहे. बीड जिल्हा हा ऊस तोड कामगारांचा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नाहीत. बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे जीवन शेतीवरच अवलंबून आहे. बीड जिल्ह्यात सिझनमध्ये शेतीपंपास पाच ते सहा तासच विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे सौरपंपाची मागणी शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गावांचा समावेश प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेत करून जिल्ह्यातील शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मुंदडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने महाउर्जा’ने बीडच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून सुधारित मानांकन झालेली सुरक्षित पाणलोटातील यादी मागवली. सदर सुधारित यादीनुसार आता बीड जिल्ह्यातील सर्वच्य सर्व 1,371 गावांचा समावेश प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेत करण्यात आला असून योजनेच्या पोर्टलमध्येही सदर गावानाचा समावेश करण्यात आल्याचे महाउर्जा’च्या महाव्यवस्थापकांनी आ. नमिता मुंदडा यांना पत्राद्वारे कळविले आहे. परिणामी, आ. मुंदडा यांच्या पाठपुराव्यानंतर कुसुम’ योजनेत समावेश झाल्याने बीड जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांना याचा लाभ मिळणार आहे.
केज तालुक्यातील सर्व गावांचा समावेश
सुरुवातीस केज तालुक्यातील अवघ्या 45 गावांचा समावेश कुसुम योजनेत समावेश करण्यात आला होता. मात्र, आ. मुंदडा यांच्या पाठपुराव्यानंतर केज तालुक्यातील सर्व 122 गावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.