बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झालेल्या व अस्तित्वात असलेल्या सर्व नळ योजनांमधून प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाने दिलेले 90 दिवसांचा उपक्रम आयोजित केलेला आहे. येणार्या 14 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाडी यांना पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी देणे व 96 हजार कुटुंबांना नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार यांनी दिले आहेत. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या आयोजित विशेष बैठकीत हे आदेश देण्यात आलेले आहेत. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप काकडे, प्रभारी कार्यकारी अभियंता श्री उबाळे सर्व विभागाचे व अभियंता व शाखा अभियंता तसेच पंचायत समिती स्तरावरील गट व समूह समन्वयक उपस्थित होते.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सर्व शाळा अंगणवाडी यांना पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी देणे, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीस प्रशिक्षण देणे व संकेत स्थळावर नियमित करणे, जिल्ह्याचा आराखडा तयार करून शासनास सादर करणे तसेच 96 हजार कुटुंबांना नळजोडणी देण्याकरिता 90 दिवसांचा उपक्रम राज्य शासनाने दिलेला आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये दिलेले सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान पाणी पुरवठा विभाग व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभाग पेलवणार आहे. जिल्ह्यात एकूण 2890 अंगणवाड्या पैकी 1614 अंगणवाड्यांना नळजोडणी देणे बाकी असून 3184 शाळांपैकी 1894 शाळांना नळ जोडणी देणे बाकी आहे तर 96000 कुटुंबांना नळजोडणी देणे गरजेचे आहे ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी 14 डिसेंबरची मुदत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मोजमाप पुस्तिका हाताळण्यात येऊ नये अथवा इतर कामे करू नयेत तसेच सरपंच व ग्रामसेवक यांना वैयक्तिक स्तरावर संपर्क करून नळ जोडणीसाठी आधार कार्ड जमा करण्याचे बंधन घालून देण्यात आलेले आहे. 14 डिसेंबर पर्यंत कामात प्रगती दिसून आली नाही अथवा कामात हलगर्जीपणा केल्यास कर्मचार्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे. पाणी पुरवठा योजना सुरु असलेल्या गावात नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सर्व ग्रामसेवकांना दिले असून या कुटुंबांची नोंद ग्रामपंचायत स्तरावर नमुना नंबर 9 नोंदवही मध्ये घेऊन नळजोडणी दिलेल्या कुटुंबांचे आधार कार्डच्या आधारे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंद करणार असल्याची माहिती विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप काकडे यांनी दिली आहे. शासनाचा 90 दिवसाचा हा उपक्रम तसेच दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व शाखा अभियंता व उपअभियंता यांना सूचना देऊन प्रत्येक तासाला गट व समुह समन्वयक यांच्या मदतीने सनियंत्रण करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. उबाळे यांनी दिली आहे.















