नाशिक, दि. 1 दि. 1 (लोकाशा न्यूज) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे सोमवारी शहरात मॅरेथॉन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्यासमवेत त्यांचे तीन कार्यक्रम होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नावानं दोन अभ्यासिकेचे लोकार्पण त्यांनी केले. दरम्यान, आपल्याकडे सहकारमध्ये खूप राजकारण आहे, पण राजकारण बाजूला ठेवलं, तर सहकार यशस्वी होतं, असं प्रतिपादन त्यांनी केलं.
पंकजाताई मुंडे यांनी सकाळी पंचवटी परिसरात आ. देवयानी फरांदे यांच्या निधीतून उभारलेल्या लोकनेते मुंडे साहेब अभ्यासिकेचे लोकार्पण केले, त्यानंतर संदर्भसेवा रूग्णालयाच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन केले. दि नासिक को-ऑप बॅकेच्या प्रशासकीय इमारतीच्या नुतनीकरणाचे उद्घाटन त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, आ. जयकुमार रावल, आ. माणिकराव कोकाटे, महापौर सतीश कुलकर्णी, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, चेअरमन हेमंत धात्रक आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, भुजबळ हे माझ्यासाठी जेष्ठ मार्गदर्शक आहेत. माझा आणि भुजबळांचा कार्यक्रम घड्याळाच्या काट्यावर सुरू होतो. प्रमोद महाजन आणि मुंडे साहेब यांच्यामुळे मी 35 ते 40 मिनिटांचे भाषण करू शकते. खरे तर बँका कशा यशस्वी होतात याबाबत आश्चर्य वाटतं. आमच्याकडे पाणी प्यायलाचं असतं. यंदा या पाण्यानं मोठं नुकसान केलं. सहकारमध्ये खूप राजकारण आहे. भुजबळांनी ते भोगलं. पण राजकारण बाजूला ठेवलं, तर सहकार यशस्वी होतं. बँक चालवणं अवघडय. आम्हाला हो म्हणायची सवय. बँकेत नो म्हणावं लागतं. नोटाबंदी झाली तेव्हा बँकांची काय परिस्थिती होईल असं वाटत होतं, पण 2 वर्षांनी सगळं स्थिर स्थावर झालं. यासाठी त्यांनी लोकांना सॅल्यूट केला. भुजबळ साहेब आपण अशा वर्गातून येतो जिथे संघर्ष केल्याशिवाय, खेचून घेतल्याशिवाय काही मिळत नाही असं त्या म्हणाल्या. नाशिक सिडको भागातील प्रभाग क्रमांक 27 मध्ये स्वामी समर्थ नगरात आ. सीमाताई हिरे यांचा निधी व लोकनेता प्रतिष्ठानचे गोविंद घुगे, नगरसेविका कावेरी घुगे यांच्या सहकार्यातून सुर्यमुखी हनुमान मंदिराच्या भव्य सभामंडपाचे तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब अभ्यासिकेचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. दिवसभर सर्व कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, आ. राहूल डिकले यांच्या निवासस्थानी तसेच विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या.
म. फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण
धोंडवीर नगर ता. सिन्नर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास त्यांनी केले. पालकमंत्री छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे, जि. प. अध्यक्ष क्षीरसागर, उदय सांगळे आदी यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले यांचं स्त्री शिक्षणाच महत्व अलौकिक आहे. क्रांतीची मशाल त्यांनी सोडली नाही म्हणूनच त्यांना क्रांतीसूर्य म्हटले जाते. म. फुलेंना भारतरत्न मिळावा ही फार वर्षांपासूनची मागणी आहे, त्यासाठी मी प्रयत्न करेन. या स्मारकाचं पावित्र्य जपा, त्यांचे विचार आचरणात आणा असं सांगून ग्रामस्थांनी व्यसनमुक्तीचा संकल्प राबवावा असे आवाहन यावेळी केले.















