बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : वैश्विक तुलनेत आपला देश सर्वात मोठी कोविड लसीकरण मोहीम राबवित आहे. नुकताच देशाने शंभर कोटी लसीकरण पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, परंतू बीड जिल्ह्यात समाधानकारक लसीकरण होताना दिसत नाही. लसीकरणाची मोहीम प्रभावी आणि कालबद्ध राबवण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशा सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. विशेष म्हणजे अधिकारी आणि कर्मचार्यांअभावी एखाद्या रूग्णाचा मृत्यू झाला तर ते मी खपवून घेणार नाही, अशी तंबी देत कर्तव्यात कसूर करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात खा.प्रितमताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील निर्माण कार्य सुरू असलेल्या आरोग्य केंद्रांचा आढावा घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी इमारत बांधकाम आणि इतर संबंधीत कार्यांना गती देणे व नवे आरोग्य केंद्र वेळेत कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांची जबाबदारी असलेले अनेक अधिकारी पूर्णवेळ रुग्णालयात उपलब्ध नसल्याच्या तक्रारी मांडताना खा.प्रितमताई मुंडे यांनी कर्तव्यात कसूर करणार्या बेजबाबदार अधिकार्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले,अधिकारी,कर्मचार्यांअभावी रुग्णाचा मृत्यू झाला तर खपवून घेणार नाही अशी तंबी त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिली. लसीकरण अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी अभिनव उपाययोजना सूचित करताना जिल्ह्यातील तहसील कार्यालय परिसर,ग्रामीण भागात राशन दुकान व देवस्थान परिसरात ही लसीकरण मोहीम राबविण्या संदर्भात विचार करण्याच्या सूचना दिल्या.लसीकरण मोहिमेला सूचनेनुसार गती दिली तर यंत्रणेवरील भार वाढू शकतो,परंतु लसीकरणाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे खा.प्रितमताई म्हणाल्या.आपण स्वतः देखील जिल्ह्यातील नागरीकांना लस घेण्यासाठी आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.















