बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : सलग महिणाभर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदाचा खरीप हंगाम पुर्णपणे उद्वस्त झाला. या अतिवृष्टीत झालेले नुकसान खुप मोठे आहे, अगदी हेच लक्षात घेवून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शेतकर्यांच्या हिताचा निर्णय घेत शेतकर्यांसाठी तात्काळ 25 टक्के अॅग्रीम मंजूर करा, असा प्रस्ताव विमा कंपनीला पाठविला होता, राज्याबरोबरच आता केंद्रानेही आपला हिस्सा दिल्यामुळे विमा कंपनीनेही सोयाबीन उत्पादकांसाठी 25 टक्के अॅग्रीम मंजूर केले आहे. त्यानुसार राज्याला 2311 कोटी तर बीड जिल्ह्याला 186 कोटी नऊ लाख रूपये मिळणार आहेत. येत्या दोन दिवसात ही रक्कम थेट शेतकर्यांच्या खात्यात पडणार आहे. विम्याच्या रक्कमेमुळेच जिल्ह्यातील शेतकर्यांची दिवाळी गोड होणार आहे.
मागच्या दोन वर्षांपासून बीड जिल्ह्यात मोठा पाऊस होत आहे. यावर्षी बीड जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनीही अगदी वेळेवरच आपली पेरणी उरकून घेतली. त्यानुसार खरीपातील पीकेही चांगलीच बहरात आली, मात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिण्यात पावसाने शेतकर्यांचा घात केला, सतत अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील खरीप पिके पुर्णपणे उद्वस्त झाली, यातून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले, या नुकसानीची स्वत: जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, शेतकर्यांना तात्काळ 25 टक्के अॅग्रीम मंजूर करावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांनी या पाहणीनंतर विमा कंपनीकडे पाठविला. या दरम्यानच्या काळात राज्याने पीक विमा कंपनीला पहिल्या हप्त्यापोटी 973 कोटी तर त्यापाठोपाठ केंद्राने 898 कोटी रूपये दिले तर शेतकर्यांनी भरलेला प्रीमियम 440 कोटी असे एकूण 2311 कोटी रूपये विमा कंपनीला मिळाले आहेत. हे 2311 कोटी महाराष्ट्रातील शेतकर्यांना मिळणार असून यापैकी 186 कोटी नऊ लाख रूपये बीड जिल्ह्यातील 5 लाख 33 हजार 712 सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या खात्यात येणार आहेत. येत्या दोन दिवसात ही रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले जात असून विम्याच्या या रक्कमेमुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची दिवाळी गोड होणार आहे.
25 टक्के अॅग्रीमसाठी कलेक्टरांनी
पाठविला होता विमा कंपनीला प्रस्ताव
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना मोठा न्याय दिला आहे. मागच्या महिणाभरापुर्वी त्यांनी विमा कंपनीला एक प्रस्ताव पाठविला होता. खरीप 2021 मधील शेतकर्यांना 25 टक्के अॅग्रीम मंजूर करावे, असे शर्मा यांनी त्या प्रस्तावात म्हटले होते, अखेर त्यांच्या या प्रस्तावाला विमा कंपनीने हिरवा कंदील दाखविला, त्यांच्या मागणीनुसार कंपनीने 25 टक्के अॅग्रीमला मंजूरी दिली आहे. याबद्दल कलेक्टर शर्मांचे जिल्ह्यातील शेतकर्यांमधून आभार मानले जात आहेत.
सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू राहणार
जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधित झालेल्या शेतकर्यांना/नागरिकांना मदत देण्याबाबत राज्य शासनाकडून अनुदान वितरीत केलेले आहे. त्याअनुषंगाने दि. 30 ऑक्टोबर 2021 दि. 31 ऑक्टोबर 2021 तसेच दि. 2 नोव्हेंबर 2021 रोजी सर्व तालुक्यांचे उपकोषागार कार्यालय चालू ठेवण्याचे गरजेचे असल्याने सर्व तालुक्यांचे उपकोषागार कार्यालय चालू ठेवावे असे, आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा बीड यांनी केले यांनी केले आहेत.
2020 च्या विम्याचा प्रश्नही सुटणार
2020 च्या खरीप हंगामातील केवळ 20 हजार शेतकर्यांना विम्याची रक्कम मिळालेली आहे. जवळपास 17 लाख 70 शेतकरी या वर्षातील विम्यापासून वंचित आहे. बीड पॅर्टनमुळे या वर्षीचे विम्याचे 626 कोटी रूपये राज्य सरकारच्या तिजोरीत गेलेले आहेत. मात्र हे हक्काचे पैसे मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आक्रमक झालेला आहे. त्यामुळेच एनडीआरएफचे पंचनामे ग्राह्य धरून हे 626 कोटी रूपये शेतकर्यांना द्यावेत, अशी सर्वस्तरातून मागणी होत आहे. त्यानुसार कृषी आयुक्तांनी एक पत्र केंद्र सरकारला पाठविले आहे. या पत्रानुसार केंद्राने आदेश दिल्यानंतर राज्य सरकार आणि विमा कंपनीला विम्याचे ते 626 कोटी रूपये कोणत्याही परिस्थितीत बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना वाटपच करावे लागणार आहेत.















