Uncategorized

टेक्नॉलॉजीवर अधिक भर दिल्यास भ्रष्टाचार आपोआप कमी होईन – एसपी आर. राजा, भ्रष्टाचार समाजाला लागलेली किड – तुषार ठोंबरे, लक्षात ठेवा, लाज देणे अन् घेणे गुन्हाच – भारत राऊत, एसीबीच्या भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन, एक नोव्हेंबरपर्यंत सप्ताहातून केली जाणार जनजागृती


बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : भ्रष्टाचार दोन प्रकारचा आहे. एक जबरदस्तीने करप्शन आणि दुसरा प्रकार म्हणजे सहमतीचा भ्रष्टाचार. सहमतीचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो. लाचलुचपत विभागाने मोठे मासे पकडले पाहिजेत असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक आर.राजा यांनी केले. भ्रष्टाचार हा समाजाला लागलेली कीड असून ती कीड कायमची नष्ट करण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोबरे यांनी दिली आहे. तर लाच देणे आणि घेणेही गुन्हा असल्याचे सांगत भ्रष्टाचारी किड मोडून काढा असे आवाहन एसीबीचे डीवायएसपी भारत राऊत यांनी केले आहे.
मंगळवारी सकाळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलन दक्षता जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली तर अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, सहा. शासकिय अभियोक्ता अ‍ॅड मिलींद वाघीरकर, अ‍ॅड अजित देशमुख, एसीबीचे डीवायएसपी भारत राऊत यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी आर.राजा व ठोंबरे बोलत होते. पुढे बोलतांना आर.राजा म्हणाले की, समाजामध्ये भ्रष्टाचार दोन प्रकारचा असून एक भ्रष्टाचार सहमतीचा आहे आणि दुसरा जबरदस्तीचा आहे. सहमतीचा भ्रष्टाचार मोठा असून या प्रकरणात मोठ्या व्यक्ती विरोधात कारवाया व्हायला हव्यात असे सांगत ते पुढे म्हणाले की, सर्वांनी नियमाचे पालन केले तर भ्रष्टाचार होणार नाही. मात्र दुर्दैवाने नियमाचे पालन होत नाही. परदेशात नियमाचे पालन होत असल्याने त्या ठिकाणी भ्रष्टाचार कमी आहे. जास्तीत जास्त लोकांचा संपर्क आल्यामुळे भ्रष्टाचार वाढतो. टेक्नॉलॉजीचा जास्त वापर झाला तर भ्रष्टाचार कमी होईल असेही ते योवळी म्हणाले, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले की, लोकांची कामे वेळेत होतात का? का विनाकारण विलंब होतो याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष दिले पाहिजे. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. एक दिलाने काम केल्यास भ्रष्टाचार कमी होवू शकतो असे ठोंबरे यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या प्रस्ताविकात भारत राऊत म्हणाले की, भ्रष्टाचार निर्मुलनाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आजपासून एक नोव्हेंबरपर्यंत हा सप्ताह चालणार आहे. भ्रष्टाचार थांबला पाहिजे, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. ते थांबले पाहिजे, घेणार्‍यांपेक्षा देणारा जास्त जबाबदार आहे. वाईट मार्ग शोधू नका, लाच देवू नका, कायदेशीर मार्गाने प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी राऊत यांनी केले आहे. यावेळी अ‍ॅड. वाघीरकर आणि अ‍ॅड देशमुख या दोघांचेही भाषणे झाली. कार्यक्रमाचे आभार पोलिस निरीक्षक सुनिता मिसाळ यांनी मानले. यावेळी एसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी, तक्रारदारांसह सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथही घेण्यात आली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!