बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : बीडमधील एका हॉटेल चालकाचे घर फोडून तब्बल आठ लाख 85 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. यामध्ये दिड लाख रूपयांची कॅश, 18 तोळे सोन्याचे दागिणे आणि दहा तोळे चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. ही घटना शहरातील शिंदे नगरमध्ये घडली असून घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बीड शहरासह जिल्हाभरामध्ये गेल्या काही महिन्यापासून चोर्याचे प्रमाण वाढले. शहरातील शिंदेनगर भागात रविवारी रात्री धाडसी चोरी झाली. घरी कोणी नसल्याचा फायदा उचलून चोरट्याने एका घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील नगदी दीड लाख रूपयांसह 28 तोळे सोन्या-चांदीचे दागिणे असे एकूण आठ लाख 85 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. घर मालक पहाटे पुण्याहून आल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे दिसून आले. धनंजय अरूण जगताप (रा.शिंदेनगर) हे काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याने याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्याने उचलून त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील नगदी दीड लाख रूपयांसह 28 तोळे सोन्या-चांदीचे असा एकूण आठ लाख 85 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे, तसेच यावेळी चोरट्यांनी रिव्हालरमधील 14 जीवंत काडतुसे पळविल्याचाही संयश व्यक्त केला जात आहे. सोमवारी पहाटे धनंजय जगताप हे घरी आले असता त्यांना आपले घर उघडे दिसले व घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या बाबत शिवाजीनगर पोलीसांना कळवले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ, शिवाजी नगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, एपीआय शेख यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी डॉग स्कॉड पथक, एलसीबी, फिंगरप्रिंट पथक दाखल झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरट्यांनी या चोरीत मोठा हात मारल्याने बीड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भितीदायकही वातावरण तयार झाले आहे.
लवकरच चोरटे गजाआड करू – साईनाथ ठोंबरे
सदर घटनेत चोरट्यांनी आठ लाख 85 हजार रूपयांचा मुद्देमाल पळविला आहे. जीवंत काडतुसे चोरीला गेले की नाही या संदर्भात चौकशी केली जात असून या घटनेतील चोरटेही लवकरच गजाआड केले जातील, असा विश्वास शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे.















