Uncategorized

प्रत्येक अडचणीत मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहणार, पंकजाताईंनी मराठवाडा विकास संघाच्या मेळाव्यात मराठवाड्यातील भूमिपुत्रांना दिला विश्‍वास


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : मध्यप्रदेशातील  प्रचार आटोपल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे रविवारी पुणे शहरात दौर्‍यावर आल्या होत्या.  मराठवाडा विकास संघाच्या मेळाव्यासह दिवसभर विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली तसेच नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोरोनाच्या काळात अनेक संकटे आली, अनेकांना नौकर्‍याही गमवाव्या लागल्या असे सांगत अडचणी छोट्या असोत की मोठ्या मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचा विश्‍वास यावेळी लोकनेत्या पंकजाताईंनी बोलून दाखविला आहे.
वानवडी येथे म. फुले सांस्कृतिक भवनात पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा विकास संघाचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, नगरसेवक संजय घुले, भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, विकास संघाचे अध्यक्ष उत्तरेश्वर घोडके, सदाशिव खाडे, अशोक मुंडे, आदी यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आणि जनतेच्या  समस्या सोडविण्यासाठी विकास मंच हे एक चांगले व्यासपीठ तयार झाले आहे. या माध्यमातून मंचने लोकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊन लोकांची सेवा करावी असे आवाहन यावेळी पंकजाताईंनी केले. यावेळी पंकजाताईंचे विकास मंचने जेसीबीने फुलांची उधळण करत जोरदार स्वागत केले.

संत भगवान बाबा मंदिरास भेट
काळे पडळ (हडपसर पुणे) भागातील राष्ट्रसंत भगवान बाबा व संत वामनभाऊ  मंदिरास भेट दिली व मनोभावे दर्शन घेतले. या परिसरातील भाविक भक्तगण मोठया संख्येने येथे आले होते, यावेळी त्यांचेशी संवाद साधत पंकजाताईंनी मंदिर परिसरात वृक्षारोपणही केले.

विविध कार्यक्रमांना हजेरी
पंकजाताई मुंडे यांच्या रविवारच्या दौर्‍यात दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल होती. युवा कार्यकर्ते संदीप सातव यांच्या हडपसर (पुणे) भागातील यागा डेअरी आणि स्वीट ब्रॅडच्या दालनाचे उदघाटन, प्रभाग 23 मध्ये अभ्यासिका इमारतीचे भूमिपूजन, संगीता डांगमाळी यांच्या कार्यालयाचे उदघाटन तसेच हडपसर भागात लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक सेंटरचे उदघाटन आदी कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!