माजलगाव : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या संकल्पनेतून स्थापित झालेली मोबाइल सर्जिकल टीम गंभीर रुग्णांसाठी चांगलीच फायद्याची ठरू लागली असून माजलगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रसूती दरम्यान अडचणीत सापडलेल्या महिलेवर अवघ्या दिड तासात अवघड शस्त्रक्रिया पार पडून टीमने आपला उद्देश सफल करीत साबळेंची संकल्पना सार्थ ठरवली आहे.
अंबाजोगाई येथील माहेर व सोनपेठ येथील सासर असलेली गरोदर महिला प्रसूती साठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दि. 6 रोजी दाखल झाली. दि. 7 रोजी पोटातील पाणी कमी झाल्यामुळे प्रसूतीला अडचणी येऊ लागल्या तसेच बाळाचे ठोके देखील कमी जास्त होऊ लागले त्यामुळे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन रुद्रवार यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्याशी संपर्क केला असता अवघ्या दिड तासात मोबाईल सर्जिकल टीम माजलगावात दाखल झाली. तात्काळ सदर महिलेवर येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुमित मसुरे टीम मधील डॉ. मनीषा तांदळे, डॉ. पाटील, डॉ. राठोड, ब्रदर भिसे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली त्यामुळे सदर महिला व तिचे बाळ आता सुखरूप असून पुढील उपचार येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू आहेत.
दरम्यान डॉ. साबळे यांनी स्थापित केलेल्या फिरत्या शस्त्रक्रिया पथकाचे परिणाम आता दिसू लागले असून त्याचा चांगलाच फायदा गरजू रुग्णांना होत असून मोबाईल सर्जिकल टीम ही गरजू रुग्णांसाठी एक मजबूत बीम ठरू लागल्याने डॉ. साबळे व टीम मधील सदस्यांचे रुग्ण आभार व्यक्त करू लागले आहेत.
— डॉ. गजानन रुद्रवार — वैद्यकीय अधीक्षक ग्रा.रु. माजलगाव
ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान अडवलेल्या महिला बाबत माहिती देताच अवघ्या दीड तासात मोबाईल सर्जिकल टीम आली त्यामुळे इतर ठिकाणी जाण्याची रुग्णावर वेळ आली नाही. आई व बाळ आता सुखरूप असून पुढील उपचार सुरू आहेत.