बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या दट्टट्याने जिल्ह्यातील बँका गतीने पीक कर्जाचे वाटप करत आहेत. त्यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्जाचे 1164 कोटी 58 लाख रूपये वाटप केले आहेत. पीक कर्जासाठी दिलेले टार्गेट बँका नक्कीच पुर्ण करतील असा विश्वास आता सर्वांना वाटत आहे.
या वर्षीच्या खरीप आणि रब्बीच्या हंगामातील पीक कर्जासाठी जिल्ह्यातील बँकांना 2000 कोटींचे टार्गेट देण्यात आलेले आहे. त्यापैकी 1600 कोटी खरीप हंगामात तर चारशे कोटी रब्बीच्या हंगामात वाटप करण्याचे बँकांना आदेश आहेत. त्यानुसारच पीक कर्जाच्या वाटपाला गती देण्यासाठी आठवड्यातील मंगळवारी जिल्हाधिकारी स्वत: बँकांची बैठक घेवून त्यांच्याकडून वाटपाचा आढावा घेत आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी नेहमीच शेतकर्यांच्या बाजूने निर्णय घेतात त्यामुळेच यावर्षी जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्ज वाटपात गती आणलेली आहे. त्यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी 1164 कोटी 58 लाख रूपये शेतकर्यांना वाटप केले आहेत. यामुळेच दिलेले टार्गेट जिल्ह्यातील सर्वच बँका पुर्ण करतील असा विश्वास यावरून व्यक्त केला जात आहे. दरम्यान रात्रीही जिल्हाधिकार्यांनी पीक कर्ज वाटपाच्या संदर्भात बैठक घेतली आहे.