बीड, दि. 1 (लोकाशा न्यूज) : जनतेच्या कामात थोडीही दिरंगाई न करता ती तात्काळ मार्गी लावावीत, म्हणजे प्रलंबित कामांचा टक्का झिरोवर आणावा, असे स्पष्ट आदेश सीईओ अजित पवार यांनी बीड पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना दिले आहेत. त्यांच्या या आदेशामुळे आता बीड पंचायत समितीमधील कामांना मोठी गती मिळणार आहे.
सीईओ म्हणून अजित पवार यांनी पदभार स्विकारताच बीड जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कामाला गती मिळाली आहे. गावांना भेटी देण्याबरोबरच त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये जावून त्या ठिकाणच्या कामांचा आढावा घेतला आहे. यापुर्वी त्यांनी जिल्ह्यातील दहा पंचायत समितींचा आढावा घेतला होता, तर शुक्रवारी त्यांनी बीड पंचायत समितीचा आढावा घेतला, प्रत्येकाने आपल्या कामाची गती वाढवावी, गतीमान होवून जनतेची कामे मार्गी लावावीत, म्हणजेच प्रलंबित कामांचा टक्का झिरो करावा, असे स्पष्ट आदेश त्यांनी बीड पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना दिले आहेत. यावेळी बीडीओ अविनाश सानप यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.















