बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : भाजपच्या राष्ट्रीय महासचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मागील वर्षी दसरा मेळाव्यात आम्ही भगवान गडावर गेल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र, गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे झाले. आजही मेळावे घेतले जात आहेत, याबाबत आपण पोलीस अधीक्षकांशी बोलणार असल्याचे पंकजाताई म्हणाल्या आहेत.
परळीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी मोठी बॅनरबाजी करण्यात आली होती. त्याबाबत पंकजाताईंना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठा अहंकार असल्याचं पंकजाताई म्हणाल्या. इतकच नाही तर मी आता पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे. आम्ही केवळ दर्शनासाठी गेलो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले. माझ्या कार्यालयावरही गुन्हे दाखल झाले. त्याच दरम्यान जिल्ह्यात वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम, दिवाळी फराळाचे कार्यक्रम झाले. आता मेळावे घेतले जात आहेत, त्याबाबत तुम्ही काय करणार? असा सवाल आपण एसपींना विचारणार असल्याचं पंकजाताई म्हणाल्या. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. मोठाले केक कापले गेले. कोरोना अद्यापही गेलेला नाही. लोक आर्थिक अडचणीत आहेत आणि यांचं काय सुरु आहे, अशा शब्दातही पंकजाताईंनी नाव न घेता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. सत्ता असो की नसो दुरुपयोग करणं हेच त्यांना कळतं, असा टोलाही यावेळी पंकजाताईंनी लगावला आहे.