बीड ।दिनांक २६।
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सगळ्यांना जपायची आहे. श्वासात श्वास असेपर्यंत दसऱ्याला भगवान भक्तीगडावर नतमस्तक होण्यासाठी मी येणार आहे, तुम्हीही येणार ना..? अशी साद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज संत भगवान बाबांच्या जन्मस्थळी घातली.
पंकजाताई मुंडे आज दुपारी संत भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव घाट येथे आल्या होत्या. गावात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी संत भगवान बाबांचे दर्शन घेतले. याठिकाणी उभारलेल्या भव्य स्मारकाला भेट देताना स्वतः पाण्यात उतरून मुर्तीचे दर्शन घेतले तसेच मेळावा मैदानाची पाहणी केली.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, दसरा हा आपल्यासाठी स्वाभिमानाचा दिवस आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम दरवर्षी यादिवशी इथे होत असतो. लोकनेते मुंडे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आपणा सर्वांना जपायची आहे. जो कधी झुकत नाही, थकत नाही आणि रूकत नाही असा वारसा तुमच्यामुळे मला मिळाला आहे, तुमच्या जीवावरच मी लढू शकते, संघर्ष करू शकते. दरवर्षी दसरा मेळाव्याला देशभरातून एका रात्रीत लाखो लोक जमा होतात, मागील वर्षी कोरोना मुळे ऑनलाईन मेळावा घेतला. ही परपंरा अखंड ठेवण्यासाठी यंदा मी नतमस्तक होण्यासाठी येणार आहे असे पंकजाताई म्हणाल्या.
मंदिराचे काम पूर्ण करू
संत भगवान बाबांच्या दर्शनाच्या ओढीने मी आज इथे आले. याठिकाणी भव्य दिव्य मुर्ती उभारली आहे, मध्यंतरी पाणी टंचाईमुळे आपल्याला मंदिर व सुशोभीकरणाचे काम करता आले नाही परंतू हे सर्व कामे पूर्ण करून सुंदर मंदिराचे काम देखील पूर्ण करू. संत भगवान बाबांचे संस्कार व स्वाभिमान जीवापाड जपण्याचे काम गावकऱ्यांनी करावे, त्यांची शिकवण आचरणात आणावी असे त्या म्हणाल्या.
ऊसतोड कामगारांनी नोंदणी करावी
ऊसतोड कामगार हा माझा कधीच राजकारणाचा विषय नव्हता. श्रेयासाठी कधी मी काम केले नाही. लोकनेते मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगारांचे महामंडळ आपण सत्तेत असताना स्थापन झाले, ते काम आता पूर्णत्वास आले आहे. हे महामंडळ आता सामाजिक न्याय विभागाकडे आहे, ऊसतोड कामगारांनी जास्तीत जास्त नोंदणी करून विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार भीमसेन धोंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राजाभाऊ मुंडे, भगवान भक्तीगड ट्रस्टचे अध्यक्ष संदेश सानप, पाटोदा पं.स. सभापती सुवर्णा लांबरूड, सावरगावचे सरपंच राम सानप आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••