Uncategorized

गरिबांचं राशन माफियांच्या कोठारात, 800 क्विंटल गहू-तांदूळ कुणाच्या तोंडात, पुरवठ्यातील अधिकारी घोटाळा दाबण्याच्या तयारीत, बीडप्रमाणेच इतर तालुक्यातही रेशनच्या धान्यात मोठा काळाबाजार !


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : बीड तालुक्यातील केशरी कार्ड धारकांचे आठशे क्विंटल धान्य काळ्या बाजारात विकल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी तीन सदस्यांची समिती निर्मित करण्यात आली आहे. 48 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आल्यानंतरही अद्यापपर्यंत अहवाल सादर करण्यात आला नसल्याने सदरचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी समितीतील अधिकारीही प्रयत्नशील आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे बीड तालुक्याप्रमाणेच इतर तालुक्यातही रेशनच्या धान्यात मोठा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर घोटाळावर पांघरून घालण्यासाठी पुरवठा विभागातील अधिकारी रात्रीचा दिवस करत आहेत. त्यामुळेच या प्रकरणातील अडकलेल्या सर्वच अधिकारी, कर्मचार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
याबाबत अधिक असे की, 20 सप्टेंबर रोजी बीड तालुक्यातील केशरी कार्ड धारकांसाठी आलेले धान्य परस्पर नायब तहसीलदार राऊत, पुरवठा अधिकारी यांच्यासह गोडाऊन किपर यांच्या संगनमतातून तब्बल 800 क्विंटल धान्य हे काळ्या बाजारात विकल्याची बाब समोर आली. यासंदर्भात समता परिषदेचे निखील शिंदे यांनी तक्रारही केलेली आहे. जुलै महिन्यातले हे एनपीएचे हे धान्य असून राशन दुकानदारांच्या परस्पर ते विकण्यात आल्याचे समोर आल्यानंतर जुन्या तारखात चलने तयार करून हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र अशा परिस्थितीतही तक्रारी झाल्यानंतर चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती जिल्हा पुरवठा अधिकारी भारती सागरे यांनी नियुक्त केली. यामध्ये सहायक लेखा अधिकारी टी.व्ही. निर्मळ, जिल्हा लेखा पर्यवेक्षक अंबाजोगाई एस.के. पाटसकर, जिल्हा लेखा पर्यवेक्षक एस.एच. मदनुरे यांना चौकशीसाठी आदेश देण्यात आले. 21 सप्टेंबर रोजी हे आदेश देण्यात आले असून 48 तासांच्या आत चौकशी करण्याची सक्त ताकिद देण्यात आली मात्र 48 तास उलटून गेल्यानंतरही अद्यापपर्यंत चौकशी अहवाल सादर केला नाही. यापेक्षा विशेष बाब म्हणजे अद्याप एकाही कुपन दुकानदाराला चौकशीसाठी बोलावले नाही. यातूनच हे प्रकरण दडपवण्यासाठी प्रचंड हालचाली सुरू आहेत. बीड तालुक्यातील गोडाऊनमधून आठशे क्विंटल धान्य काळ्या बाजारात गेल्याचे उघड झाले. त्याचप्रमाणे अन्य तालुक्यातही केशरी कार्ड धारकांचा मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला आहे, असे सांगण्यात येते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!