Uncategorized

नरेगाच्या कामात थोडाही भ्रष्टाचार चालणार नाही, चुका करणार्‍यांना जागच्या जागी बडतर्फ करणार, सीईओंचा झेडपीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कडक कारवाईचा ईशारा, प्रत्येकाला कामाची जबाबदारी दिली निश्‍चित करून


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : नरेगा अशी एकमेव योजना आहे जी की या योजनेतून ग्रामीण भागाच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी दिला जातो, मात्र गावांचे कल्याण करणार्‍या या योजनेला पुर्णपणे चुरून खाण्याचे काम आतापर्यंत बीड जिल्ह्यात अनेकांनी केलेले आहे. अशा घोटाळेबाजांवरच सध्या जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा आणि सीईओ अजित पवार यांच्या आदेशाने कारवाई सुरू आहे. तर भविष्यात नरेगाच्या होणार्‍या कामात थोडाही भ्रष्टाचार झाला तर खपवून घेणार नाही, या कामात जाणून बुजून चुका करणार्‍यांवर जागच्या जागी बडतर्फीची कारवाई केली जाईल, अशा कडक कारवाईचा थेट ईशारा सीईओ अजित पवार यांनी झेडपीच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दिला आहे. विशेष म्हणजे कोणत्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कोणत्या दिवशी काय काम करावे, याची जबाबदारीही त्यांनी प्रत्येकावर निश्‍चित करून दिली आहे. सीईओंच्या याच ईशार्‍यामुळे आता जिल्हा परिषदेची संपूर्ण यंत्रणा खडबडून कामाला लागली आहे.
नरेगाच्या कामासंदर्भात येथील नियोजन विभागाच्या सभागृहात सीईओ अजित पवार यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बैठक घेतली. यावेळी झेडपीच्या ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे, नरेगा कक्षाचे बीडीओ गर्जे, केजचे बीडीओ जायभाये, परळीचे केंद्रे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी सीईओ अजित पवार यांनी नरेगाच्या जिल्ह्यातील कामांचा संपूर्ण आढावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. नरेगा ही ग्रामीण भागाच्या विकासाला गती देणारी योजना आहे. त्यामुळे या योजनेची कामे गतीने आणि अत्यंत पारदर्शक पध्दतीने झाली पाहिजेत, या योजनेच्या कामात थोडाही भ्रष्टाचार झाला तर तो खपवून घेणार नाही, कामात जाणून बुजून चुका करू नका, चुका करणार्‍यांना जागच्या जागीच बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा थेट ईशाराच यावेळी सीईओंनी दिला आहे. या ईशार्‍याबरोबरच कोणत्या अधिकार्‍याने कोणत्या कर्मचार्‍यांने कोणत्या दिवशी कोणते काम करायचे यासंदर्भात सीईओंनी संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित करून दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!