सन्मान
बीड । दि. १७ ।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त बीड येथे भाजपतर्फे केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवून सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास हा भाजपचा मुलमंत्र सार्थकी ठरवला आहे अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.तर प्रधानमंत्री मोदींच्या जन्मदिनानिमित्त गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कोरोनामुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील पाल्यांना सहाय्य करणार आहे.हा उपक्रम १७ सप्टेंबर पासून ते १२ डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून दिली.
देशाचा वैश्विक स्तरावर गौरव वाढविणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर सेवा समर्पण अभियान राबविण्यात येत आहे.या अभियाना अंतर्गत बीड येथे भाजपतर्फे केंद्र सरकारच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मानपत्र आणि मिष्ठान्न देऊन सत्कार करण्यात आला.तत्पूर्वी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त खा.प्रितमताई मुंडे यांनी स्मृतीस्तंभाला पुष्पार्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना खा.मुंडे म्हणाल्या की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनसामान्यांच्या उत्थानासाठी अनेक योजना राबवित आहेत.देशाचा प्रधानसेवक म्हणून जनसामान्यांची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस केंद्र सरकारच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान करून साजरा केल्याने आजच्या दिवसाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे.देशातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे कार्य त्यांच्या हातून अविरत घडो आणि आम्हाला यामाध्यमातून सर्वसामान्यांची सेवा आणि सन्मान करण्याची संधी मिळत राहो’ असेही त्या म्हणाल्या.यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह,विविध योजनेचे लाभार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
•••••