Uncategorized

मृत्यूनंतरही मातेच्या मिठीत लेकरू ; दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत शिक्षिकेचा मृतदेह आढळला

नांदूरघाट ( ता.केज ) : दोन दिवसांपूर्वी माहेरी आलेल्या शिक्षिकेचा मृतदेह तिच्या दीड वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत आढळून आला . कोरोनामुळे ( Corona Virus ) पतीचे निधन झाल्यामुळे शिक्षिका विरहात होती . माय – लेकीच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे . दरम्यान , मातृप्रेम किती घट्ट असते याचा प्रत्यय बाणेगावच्या ( ता.केज ) ग्रामस्थांना १६ रोजी आला . विहिरीतील पाणी उपसल्यानंतर आईच्या कडेवर लेक अन् लेकीचा आईच्या हातात हात होता … हे चित्र पाहून उपस्थितांना गहिवरुन आले . आशा सुंदर जाधवर ( २२ ) व शांभवी सुंदर जाधवर ( १८ महिने ) अशी त्या माय – लेकीची नावे आहेत.

आशा यांचे बाणेगाव हे माहेर असून त्यांचा विवाह सुंदर जाधवर ( रा.वडजी ता.वाशी जि.उस्मानबााद ) यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता . आशा व सुंदर हे दोघेही शिक्षक होते . ते पुण्यात वास्तव्यास होते . वर्षभरापूर्वी सुंदर यांना कोरोनाची लागण झाली , यातच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले . पतीच्या जाण्याने आशा सैरभर झाल्या होत्या . दोन दिवसांपूर्वी त्या मुलगी शांभवीसह माहेरी बाणेगावला आल्या . १६ सप्टेंबर रोजी वडील बाहेरगावी गेले होते तर आई शेतीकामात व्यस्त होती . दुपारी ४ वाजता मुलगी शांभवीला कडेवर घेऊन आशा शेतात गेल्या . यावेळी खेळता – खेळता मुलगी विहिरीजवळ गेली . तिचा तोल गेल्याने धावत जाऊन आशा यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला . मात्र , दोघींचाही बुडून मृत्यू झाला .

एकाच चितेवर अंत्यसंस्कार
केज ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे , उपनिरीक्षक दादासाहेब सिध्दे , जमादार जसवंत शेप , रशीद शेख यांनी धाव घेतली . १६ रोजी रात्री उशिरा मायलेकीचे मृतदेह नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात पाठविले . १७ रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले . सकाळी ११ वाजता मायलेकीवर एकाच चितेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले . कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत . नातेवाईकांचे जवाब बाकी असून अधिक तपास सुरु असल्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले .

पाच पंपाद्वारे उपसले पाणी
आशा व शांभावी या मायलेकी गायब झाल्याने शोधाशोध सुरु झाली . सायंकाळी सहा वाजता विहिरीच्या काठावर आशा यांची चप्पल आढळली . त्यामुळे त्या दोघी विहिरीत पडल्याची शक्यता गृहित धरुन तरुणांनी विहिरीत उड्या घेतल्या . विहीर पाण्याने तुडूंब भरलेली असल्याने पाच विद्युतपंपांद्वारे पाणी उपसा सुरु झाला . रात्री साडेअकरा वाजता पाणी उपसा केल्यावर माय – लेकीचे मृतदेह आढळून आले . यावेळी आशा यांच्या कडेवर मुलगी शांभवी होती तर शांभवीचा हात आईच्या हातात होता .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!