Uncategorized

राज्य सरकारने अतिवृष्टी बधितांना तात्काळ मदत जाहीर करावी,खा.प्रितमताई मुंडे यांची मागणी,नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना साकडे

बीड । दि.०८ ।
सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची मोठी वाताहत झाली आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले घास हिरावला गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत,राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती घेताना प्रभावित क्षेत्राच्या मदतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वय साधण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गावोगावी जाण्यापेक्षा ज्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याठिकाणी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून सरकारकडे मदत मागण्याची मागणीही खा.प्रितमताई मुंडे यांनी केली आहे.

मदतीसाठी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिके अक्षरशः आडवे पडले आहेत.सरकारने तात्काळ मदत जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार द्यावा यासाठी खा.प्रितमताई मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.आमचा दुष्काळग्रस्त जिल्हा भयंकर अतिवृष्टीचा सामना करत आहे,प्रशासन त्यांचे कर्तव्य पार पाडत असले तरी दोन वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी सरकारकडे आशेने बघत आहेत.प्रभावित क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे,हा त्यांचा अधिकार असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी म्हंटले आहे.

••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!