Uncategorized

अंबाजोगाई ठाण्यातून पळालेल्या ‘ त्या ‘ दरोडेखोरास केज पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

बीड दि .2 : अंबाजोगाई येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल सहा वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गजाआड केले होते . त्यानंतर या आरोपीस अंबाजागाई शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले . अंबाजोगाई शहर पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे सदरील आरोपीने ठाण्यातून पलायन केले आहे . त्यानंतर काही तासातच केज पोलिसांनी या आरोपीस जेरबंद केले आहे . हा आरोपी पुण्याला जाण्याच्या तयारीत होता . समाधान वैरागे ( 32 , रा.जवळबन ता.केज ) असे त्या आरोपीचे नाव आहे . 2016 मध्ये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंपावर दरोडा पडला होता . या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता . मात्र , पोलिसांना तो सापडत नव्हता . दरम्यान , तो जवळबन येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन 1 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना केले . या पथकाने दिवसभर पाळत ठेऊन सायंकाळी मुसक्या आवळल्या . दरम्यान , वैद्यकीय तपासणी करुन त्यास अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात दिले . त्यानंतर पथक निघून आले . ठाणे अंमलदाराच्या खुर्चीजवळ बसलेल्या समाधान वैरागे याने पोलीस कामात व्यस्त असल्याची संधी साधत रात्री साडेआठ वाजता ठाण्यातून पलायन केले . तो पळून गेल्याने ठाण्यात एकच गोंधळ उडाला होता . त्याच्या शोधात दोन पथके रवाना करण्यात आली होती . मात्र केज पोलिसांनी या आरोपीला पुण्याला जाण्याच्या तयारीत असताना केज पकडले . ही कारवाई केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अशोक नामदास , शेख मतीन यांनी केली . या आरोपीस पुन्हा अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!