अंबाजोगाई : बुधवारी रात्रीनंतर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला . बुधवारी रात्री उशीरा वाघाळा ( ता . अंबाजोगाई ) येथील तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले . या अपघातात त्या तरुणाचा मृत्यू झाला . तर , गुरुवारी सकाळी होळ ( ता . केज ) येथे रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत धारूर तालुक्यातील तरुण ठार झाला . निकेतन दिलीप हजारे ( वय ३० ) असे वाघाळा येथील अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे . निकेतन मोबाईल टॉवरच्या कामावर लेबरचे काम करत असे . बुधवारी रात्री उशीर १२.४५ वाजताच्या सुमारास तो एकाला भेटण्यासाठी वाघाळा येथून सेलू अंबा टोलनाक्याकडे पायी निघाला होता . यावेळी त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली . या अपघातात निकेतनचा जागीच मृत्यू झाला . मयत निकेतनच्या पश्चात आई , पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे . दुसरा अपघात गुरुवारी ( दि .०२ ) सकाळी होळजवळ झाला . कारी ( ता . धारूर ) येथील संतोष रामभाऊ मुजमुले ( वय २७ ) हा तरुण होळ येथे मावशीकडे आला होता . सकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला बसला असताना त्याला रुग्णवाहिकेने धडक दिली . या अपघातात जबर जखमी झालेल्या संतोषचा जागीच मृत्यू झाला . अपघातानंतर रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली .