महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यावर आभाळ कोसळले; दरडींनी घेतला 60 जणांचा बळी

​महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी काेसळलेल्या दरडीमध्ये 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाेलादपूर येथील पडलेल्या दरडीमध्ये 11 असा एकूण 60 जणांचा बळी गेला आहे. पाेलादपूर येथील किरकाेळ जखमींना महाड, पाेलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयात दाखल केले आहे. ​
सकाळी सुरु झालेले बचाव कार्य सायंकाळी सहा वाजता थांबवण्यात आले आहे. बचाव पथक, पाेलिस यंत्रणा आणि डाॅक्टर्स यांनी बचाव कार्य संपले असल्याचे सांगितले आहे, ढिगऱ्या खाली काेणी अडकले आहे का याची खात्री पुन्हा एकदा करण्यासाठी शनिवारी बचाव कार्य हाती घेण्यात येणार अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.​ ​तळीये हे गाव दरड प्रवण गावामध्ये नव्हते, जी गावे आहेत त्या गावातील नागरिकांना आधीच सर्तकतेच्या सुचना दिल्या हाेत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने रायगड जिल्ह्याला चांगलेच झाेडपले आहे. अतिवृष्टीने आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा महाड तालुक्याला बसला आहे. गुरुवारी महाड आणि पाेलादपूर तालुक्यात दरडी पडण्याच्या घटना घडल्या. महाड तालुक्यातील तळीये या गावात गुरुवारी सांयकाळी चार वाजण्याचा सुमारास दरड काेसळली हाेती. याची माहिती प्रशासना सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर बचाव कार्य हाती घेण्यात आले. परंतू पावसाचा जाेर, पुराचे पाणी, मार्गात दरडी पडल्याने घटनास्थळी पाेचण्यात अडचणी येत हाेत्या. पाचाड मार्गेही दरड काेसळली हाेती. त्यामुळे अडथळा निर्माण झाला हाेता.​ ​रात्री हेलीकाॅप्टरच्या सहायाने घटनास्थळी बचाव पथकाला उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अतिवृष्टीमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर शु्क्रवारी सकाळी 11 वाजता मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत 38 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले हाेते. सायंकाळी सहा वाजता खात्री झाल्यावर बचाव कार्य थांबवण्यात आले.​ ​दरम्यान, पाेलादपूर येथील केवनाळे येथे चार घरांवर दरड काेसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुतारवाडी येथेही दरड पडल्याने पाच असा एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दाेन्ही गावातील 13 जखमींना महाड  पाेलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!