बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्राबरोबरच बीड जिल्ह्यातील जलसंजीवनी सौर पंप योजनेच्या नावाने अनेक शेतकर्यांची लाखो रूपयांची फसवणूक करून सदर कंपनी चालक फरार झाले आहेत. सर्वात जास्त असा प्रकार केज तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे या बाबत केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्यामध्येही काही शेतकर्यांनी तक्रार नोंदविली आहे. तर या प्रकरणाची तात्काळ दखल घेवून आ. नमिता मुंदडांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.
जलसंजीवनी ग्रामविकास संस्था अंतर्गत, सुदर्शन सौर पंप शासकीय योजनेमधून मिळणार व यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावेत, अशा प्रकारची जाहिरात करून भ्रमणध्वनी वरून शेतकन्यांशी सदर कंपनी मार्फत संपर्क करून व सदर योजनेबाबतचा बनावट शासन निर्णय शेतकर्यांच्या मोबाईलवर पाठऊन शेतकन्यांचा विश्वास संपादन करून पैसे भरून घेण्यात आले. कालांतराने संपर्कासाठी देण्यात आलेले मोबाईल बंद करण्यात आले व शेतकन्यांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेला शेतकरी फसवणूक झाल्यमुळे चिंतेत आहेत. तरी केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्यामध्ये सदर कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत फसवणूक आली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत त्वरित चौकशी करून सदर कंपनीवर कार्यवाही करून शेतकर्यांनी सौर पंपासाठी भरलेली रक्कम परत देण्याबाबत किंवा शेतकर्यांना सौर पंप बसवून देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.