बीड परळी

वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रताप हुंडा घेतला एकीकडून लग्न केले दुसरीसोबत ; परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल

तुमच्या मुलीबरोबर लग्न करतो मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी ७ लाख रुपये द्या असे म्हणून एका वैद्यकीय अधिकाऱ्याने परळीतील मुलीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे मागणी घातली.साखरपुडाही झाला, मात्र हुंडा घेतल्यानंतर त्याने परस्पर दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याच्या आरोपावरून त्या अधिकाऱ्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील साकोळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. संदीप वसंतराव मंत्रे (रा. सोमेश्वरनगर, परळी) असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, गतवर्षी १८ सप्टेंबर रोजी संदीप त्यांच्या घरी आला. मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, मी तुमच्या मुलीशी लग्न करतो अशी त्याने मागणी घातली. मुलगा डॉक्टर आहे, स्वतः मागणी घालत असल्याने स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले. २३ सप्टेंबर रोजी दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. २१ ऑक्टोबर रोजी मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि लग्न यावर्षी ५ मे रोजी करण्याचे ठरले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली. मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या इतर सर्व साहित्य खरेदी केले. मात्र, २३ मार्चपासून संदीपने त्याचा मोबाईल बंद केला. अखेर ४ एप्रिल रोजी संदीपने त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाल्याचे व्हॉट्सपवर व्हिडीओ क्लिपमध्ये सांगून या लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून डॉ. संदीप मंत्रे याच्यावर परळी शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, संदीपने हुंडा घेतलेल्या मुलीच्या कुटुंबियांना अंधारात ठेऊन दहा वर्षापासून ओळख असलेल्या मुलीसोबत लातूर जिल्ह्यातील रायवाडी येथील मंदिरात लग्न केले. याच मुलीसोबत लग्न करण्याचे निश्चित असतानाही संदीपने माझ्या मुलीसोबत विवाह करतो म्हणून सात लाख रुपये घेऊन फसवणूक केली असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!