महाराष्ट्र

प्रवाशांना दिलासा; एसटी राज्यभरात धावण्यास सज्ज

अधिक कडक निर्बंधामुळे बंद असलेल्या एसटी गाड्या आता पुन्हा एकदा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’धावण्यास सज्ज होत आहेत. राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी सुरू करण्यासाठी राज्यातील अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, मुंबई आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी नसल्याने तूर्तास मुंबईकरांच्या एसटी प्रवासावर अंकुश कायम राहणार आहे. एसटी बंद असल्याने धूळखात असलेल्या गाड्यांची साफसफाई आणि देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. पावसाळा लक्षात घेता गळकी छते, नादुरुस्त खिडक्या, चालकासमोरील वायपर ही कामे प्राधान्याने करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत एसटी फेऱ्या सुरू होणार असल्याने, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

करोना प्रादुर्भावामुळे जिल्हातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. आता करोना स्थिती नियंत्रणात आल्याने बस सेवा सुरू करण्यात याव्यात, असे पत्र हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महामंडळाच्या परभणी विभागाला पाठवले आहे. याचप्रमाणे अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी आपआपल्या जिल्ह्यांतर्गत गाव-तालुक्यातील एसटीसेवा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी स्थानिक एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.मुंबई आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून एसटी गाड्या सुरू करण्याबाबत मुंबई विभागाला अद्याप कोणतेही पत्र आलेले नाही. तसेच गाड्या सुरू करण्याबाबत काही आदेशही मिळालेला नाही. यामुळे मुंबईहून ये-जा करणाऱ्या बस सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहेत. सध्या केवळ अत्यावश्यक प्रवाशांसाठी एसटी बस सेवा सुरू राहणार असून, यातून प्रवास करताना सरकारच्या अधिक कडक निर्बंधाचे अत्यंत काटेकोर पालन करणे गरजेचे असणार आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!