बीड । दिनांक ०४।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना आणखी एक यश आले असून केंद्र सरकारने परळी बाह्यवळण रस्त्यासाठी ६० कोटी तर परळी- धर्मापूरी रस्ता रुंदीकरणासाठी ७९ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
परळी बायपास रस्त्याच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी पंकजाताई मुंडे यांनी सत्तेत असताना सुरवातीपासूनच मोठे प्रयत्न केले होते, वेळोवेळी सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जमीन संपादन व अन्य बाबी पुर्ण करून घेतल्या होत्या. या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी पंकजाताई यांनी व ४ मार्च २०२० रोजी खासदार डॉ.प्रितमताई यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून मागणी केली होती, याशिवाय मागील महिन्यात नवी दिल्ली येथे गडकरी यांची भेटही घेतली होती.
आज स्वतः गडकरी यांनी ट्विट करून परळी बायपास एनएच ५४८ बी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी ६० कोटी २३ लक्ष रू. तर परळी-धर्मापूरी-पानगांव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ७९ कोटी ७२ लक्ष रूपये निधी मंजूर केल्याची माहिती दिली.
श्रेय घेण्याची पालकमंत्र्यांची नौटंकी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंकजाताई व आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच बीड जिल्हयात विविध रस्त्यांसाठी तसेच परळी बायपास करिता निधी मंजूर केला आहे. हा निधी केंद्राचा असताना याचे श्रेय घेण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न हास्यास्पद नौटंकी आहे. सत्ता येऊन दीड वर्षे लोटले पण त्यांनी जिल्हयासाठी कसलाही निधी आणला नाही, उलट केंद्राकडून आलेल्या निधीचे श्रेय घेण्याचा स्टंट मात्र ते करत आहेत. बीड रेल्वेसाठी केंद्राने निधी दिला पण राज्याचा वाटा आणण्यात मात्र ते सपशेल अपयशी ठरले आहेत अशी टिका खा. प्रितमताई यांनी केली आहे.
••••