बीड

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार अलिप्त – जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे

बीड दि.19 (प्रतिनिधी)ः- उद्या दिनांक 20 मार्च रोजी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान होत असून या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अलिप्त राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, विलास बडगे, दिनकर कदम, अरुण डाके, दिलीप गोरे, गणपत डोईफोडे, वैजनाथ तांदळे यांनी दिली आहे

उद्या दि.20 मार्च रोजी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी मतदान होत आहे. उच्च न्यायालय औरंगाबाद व सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या निर्णयानुसार कलम 73 अ नुसार बँकेचे कोरम पूर्ण होण्यासाठी किमान 13 संचालकांची आवश्यकता आहे मात्र ही निवडणूक केवळ 8 जागांसाठीच होत आहे. सहकारी बँकेच्या निवडणूक नियमानुसार सेवा सहकारी संस्था या मतदारसंघातील मतदार हा अ व ब या दर्जाचे लेखापरिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. परंतू दुर्देवाने बीड जिल्ह्यात काही मोजक्याच संस्था हा दर्जा प्राप्त करू शकलेल्या आहेत व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 11 मतदारसंघात ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते त्यापैकी एकाही उमेदवाराची सेवा सहकारी संस्था ही अ ब दर्जाची लेखा परिक्षण झालेली नव्हती. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या मतदारसंघातील सर्व उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवले. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आलेली होती परंतू ती याचिका फेटाळण्यात आली व निवडणूक निर्णय अधिकारी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी दिलेला निर्णय कायम ठेवण्यात आला. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्याकडे निवडणूक याचिका दाखल करण्यात आलेली होती परंतू ती दि.18/03/2021 रोजी फेटाळण्यात आली व उच्च न्यायालय औरंगाबाद यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला. या दोन्ही निर्णयामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेच्या 19 जागांपैकी केवळ 8 जागांसाठीच मतदान घेतले जात आहे. 97 व्या घटना दुरूस्ती अन्वये महाराष्ट्र सहाकारी संस्था अधिनियम 1960 च्या घटना दुरूस्तीचा विचार पाहता व न्यायालयाचा निकाल पाहता बँकेचे बोर्ड अस्तित्वात येत नाही त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार परदेशी दिनेश जगन्नाथ, सानप चंद्रकांत भोंजीबा, शेळके कल्पना दिलीप, भोसले दिलीप ज्ञानदेव, पंडित बदामराव लहूजी व काळे जगदीश वासूदेव हे उमेदवार या निवडणूकीपासून आलिप्त राहणार आहेत. मतदारांचे श्रम व वेळ वाया जावू नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्यावर सर्व प्रेम करणार्‍या मतदार बंधू भगिनिंनी बँकेच्या मतदानात सहभागी होऊ नये असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, विलास बडगे, दिनकर कदम, अरुण डाके, दिलीप गोरे,गणपत डोईफोडे वैजनाथ तांदळे, यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!