बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : बीड-जालना महामार्गावर असलेल्या पारगाव जप्ती येथील राजवेअर हाऊसला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत तब्बल 75 कोटी रूपयांचा कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. 12 तासानंतरही ही आग विझवण्यास अग्निशामक दलाला यश आलेले नाही.
बीड शहरापासून जवळच पारगाव जप्ती येथे राजवेअर नावाचे हाऊस आहे. या हाऊसमध्ये मंगळवारी पहाटे 12.30 च्या दरम्यान अचाणक आग लागली, या आगीत बुलढाणा अर्बनमार्फत ठेवलेल्या कापसाच्या 23 हजार गाठी व इतर सहा ते सात हजार अशा एकूण 30 हजार गाठी जळून खाक झाल्या आहेत. तसेच चाळीस हजार स्क्वायर फुटचे गोडावून या आगीत जळून खाक झाले आहे. ही आग एवढी भयाणक होती की अग्नीशामक दलाला ती 12 तासानंतरही आटोक्यात आणण्यास यश आले नाही. बीड, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यातून अग्निशामक दलाच्या जवळपास 25 गाड्या ही आग विझवण्यासाठी दाखल झाल्या होत्या. या सर्व गाड्यांना अद्याप आगीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून सदर आग विझवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील नागरिकांसह गोडावून मालकाकडून करण्यात आली आहे.