मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि त्यानंतर मुंडे यांनी दिलेली विवाहबाह्य संबंधाची दिलेली कबुली, यावरुन चांगलच राजकारण तापलं आहे. या सगळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने महाविकासआघाडी सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कोअर टीमची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित आहेत. (NCP Core Team Meeting Discussion Dhananjay Munde Allegation)
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी राष्ट्रवादीच्या कोअर टीमची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे उपस्थित आहे. या बैठकीत धनंजय मुंडे प्रकरणावर चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे.
धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला. विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडली. त्याआधी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीलाही गेले होते.
पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य : धनंजय मुंडे
बलात्कारासारखे गंभीर आरोप झाल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी आपला दैनंदिन क्रम तसाच ठेवला आहे. आरोपांनंतरही ते वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावत आहेत. आज (14 जानेवारी) त्यांनी जनता दरबारही घेतला आणि विविध नागरिकांचे प्रश्न जाणून घेत त्यावर उपाययोजना केल्या. मात्र यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवत होता
यावेळी धनंजय मुंडेंनी आपली प्रतिक्रिया दिली. “मी माझी भूमिका मांडली आहे. वरिष्ठांशी माझी चर्चा झाली आहे. आता पक्ष आणि पवारसाहेब यावर निर्णय घेतील.” असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं.