बीड, दि. 13 ऑक्टोबर :- पोलिस अधिक्षक कार्यालय बीड येथे सफाई कामगार म्हणून नौकरी लावण्याचे आमिष दाखवून फिर्यादीसह अन्य महिलांकडून 1 लाख 45 हजार रुपये घेतले. वकील असल्याची बतावणी करुन तुमच्या नौकरीसाठी फिर्यादीच्या वडिलांकडून अडीच एक्कर शेती स्वत:च्या नावावर खरेदीखत करुन देण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोन वकीलांविरुद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेखाबाई मारोती चव्हाण (वय35) रा. बार्शीनाका, पेठ बीड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीनीं संगनमत करुन माझ्यासह साक्षीदार महिलांना पोलिस अधिक्षक कार्यालय बीड येथे सफाई कामगार म्हणून नोकरी लावते म्हणून माझ्याकडुन 50 हजार रुपये व साक्षीदार महिलांनी 1 लाख 45 हजार रुपये घेतले. नोकरीचे अमिष दाखवून वकील असल्याची बतावणी करुन तुमच्या नोकरीसाठी जमीन द्या असे सांगितले. फिर्यादीचे वडिल सुंदर पांडुरंग कागदे यांची घनसांगवी ( जि.जालना) शिवारातील सर्व्हे नं.205 मधील 16 लाख 67 हजार किंमतीची अडीच एक्कर शेती स्वत:च्या नावावर खरेदीखत करुन देण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी नाजीया शेख पाशा (रा.मोमीनपुरा, पेठ बीड), वरिष्ठ वकील बारगजे आणि लोणकर वकील (पुर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात काल कलम 420, 34 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सपोनि.दासरवाड हे करत आहे.