बीड : कोरोनासंदर्भात नागरिकांच्या शरीरातील अँटीबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी आयसीएमआर’कडून 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान सेरो सर्व्हे’ केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर, जळगाव व सांगली अशा 6 जिल्ह्यांतील 60 गावांची निवड केली आहे.
मे 2020 मध्ये राज्यातील सहा जिल्ह्यांत भारतीय आयुर्विज्ञान संसाधन परिषदेच्या वतीने सेरो सर्व्हे करण्यात आला होता. यात या सहा जिल्ह्यांतील 1593 लोकांच्या रॅपीड टेस्ट करण्यात आल्या होत्या. यात 27 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. टक्केवारीनुसार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 1.51 लोकांना याची लागण झाल्याचे समजले होते. तर सर्वात कमी 05 टक्के हा जळगाव जिल्ह्याचा आकडा होता. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत याची माहिती घेऊन कोरोनाचा अंदाज घेतला होता. आता पुन्हा राज्यातील याच जिल्ह्यात सेरो सर्व्हेचा दुसरा टप्पा हाती घेण्यात आला आहे. बीड जिल्ह्याचे हिंगणी, पांगरी, आमला, तळेवाडी, पिंपळनेर, चंदणसावरगाव, मोहा, नांदगाव, बीड वॉर्ड 23, परळी वॉर्ड 30 येथे होणार आहे.
अॅटॅक रेटही काढण्यात येणार
या सर्वेक्षणात टेस्ट केलेल्या लोकांची वय, लिंगानुसार तपासणी केली जाणार आहे. त्याद्वारे कोरोनाचा अॅटॅक रेटही काढण्यात येणार आहे. मागच्या सर्वेक्षणात ही माहिती नव्हती. यासंदर्भात सोमवारी राज्यातील सर्वच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाजयांना याची माहिती देण्यात आली आहे. त्या दृष्टीने या जिल्ह्यांतील 60 गावांत तयारी करण्यात येत आहे.