बीड

हभप साहेबराव नखाते यांचे निधन, बप्पांच्या निधनाने धारूर तालुक्यातील वारकरी सांप्रदायाची मोठी हानी



धारूर, दि. 14 (लोकाशा न्यूज) : आवरगाव (ता.धारूर) येथील ज्येष्ठ नागरिक हभप साहेबराव किसनराव नखाते (वय 87 वर्षे) यांचे गुरूवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या या निधनाने धारूर तालुक्यातील वारकरी सांप्रदायासह आवरगावकरांची मोठी हानी झाली आहे.
मराठवाडा ही संतांची, वारकर्‍यांची भुमी आहे. त्यानुसार धारूर तालुक्यातही वारकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आवरगाव (ता. धारूर) येथील जेष्ठ नागरिक हभप साहेबराव किसनराव नखाते हेही वारकरीच. जिल्ह्याचे माजी खा. रामरावजी आवरगावकर यांच्यासोबतही ते सातत्याने अनेक धार्मिक कार्यक्रमात सहभागी असायचे. उत्कृष्ठ पखवाजवादक म्हणून त्यांनी संपूर्ण पंचक्रोशित स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे ईश्‍वराच्या, पांडूरंगाच्या सेवेत, भक्तीत ते कधीच कमी पडले नाहीत, मागील सलग दहा वर्ष त्यांनी हभप फुटाणेे महाराज यांच्यासोबत दिंडीमध्ये पंढरपूरची वारी केली. तालुक्यात कुठेही भजन, किर्तन असल्यास त्यांना आवर्जून निमंत्रण यायचे. कारण त्यांनी नि:स्वार्थपणे स्वत:ला धार्मिक कार्यात झोकून दिलेले होते. स्वार्थ, मोह, अहंकार या गोष्टी त्यांनी कधीच स्वत:जवळ येवू दिल्या नाहीत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात एक आपुलकीचं घर निर्माण झालं होतं. बप्पा याच नावाने ते संपूर्ण तालुक्यात परिचित होते. मागच्या दहा दिवसांपुर्वी तुळजामातेचे दर्शन घेवून गावाकडे परत येताना काळाने त्यांना गाठले. प्रवासात छोटासा र्‍हदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागच्या आठ दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. हीच त्यांची झुंज गुरूवारी अखेरची ठरली. गुरूवारी दुपारी त्यांचे दुख: द निधन झाले. सायंकाळी आवरगाव येथील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. वारकरी सांप्रदायाबरोबरच पंचक्रोशितील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शेवटचा निरोप दिला. त्यांच्या या निधनाने धारूर तालुक्यातील वारकरी सांप्रदायाबरोबरच आवरगावकरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, भाऊ, भावजयी, दोन मुलं, मुली, सुना, जावई, पुतण्या, नातवंडे, नातजावाई असा मोठा परिवार आहे. ते सेवानिवृत्त शासकिय कर्मचारी नवनाथ नखाते यांचे बंंधु, आवरगावचे माजी उपसरपंच कल्याण नखाते यांचे वडील तर सारणी जि.प.शाळेचे शिक्षक अशोक नखाते यांचे चुलते होते.. नखाते कुटूंबियांच्या दुखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे. त्यांचा सावडायचा कार्यक्रम उद्या दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!