बीड

एसपींचा दणका, पोलिस कर्मचारी कडुळे, बहीरवाळांना थेट सेवेतून केले बडतर्फ


बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : वाळू माफियाशी हात मिळवणी करणार्‍यासह  गांजा ओढणार्‍या कर्मचार्‍याला पोलिस अधीक्षक नवनित काँवत यांनी मोठा दणका दिला आहे. त्या दोघांनाही श्री. काँवत यांनी थेट सेवेतूनच बडतर्फ केले आहे. यामुळे बीड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई रामप्रसाद शिवनाथ कडुळे यांना 2024 मध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी 5000 रूपयांची लाच घेतांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबन कालावधी संपल्यानंतर त्यास पोलीस मुख्यालय येथे नेमणुक देण्यात आली होती. पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस असतांना श्री. कडुळे यांनी पोलीस स्टेशन पिंपळनेर हद्दीतील वाळू चोरीच्या गुन्ह्यात पाहीजे असलेला आरोपी गोरख काळे याच्या संपर्कात राहुन त्यास पोलीसांच्या गोपनीय हालचालींची माहीती देणे तसेच त्यास पळवुन लावण्यास सहकार्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने पोशि कडुळे यास पिंपळनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 78/2025 कलम 49, 303 (2), 3(5) भा.न्या.सं. 2023 सह कलम 130/177, 39/192 प्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन तो सध्या पोलीस कोठडीत आहेत.
श्री. कडुळे यांचे वर्तन हे गुन्हेगारी स्वरुपाचे असुन पोलीस खात्यास न शोभणारे आहेत. त्यांच्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असल्याने मंगळवार दि. सहा मे रोजी पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांनी त्यास भारतीय संविधान चे कलम 311(2) (ब) अन्वये पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे.  त्याचप्रमाणे सध्या पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानाचे बांधकाम दुरुस्तीचे काम सुरु आहे. सदर ठिकाणी पोलीस मुख्यालयातील अंमलदार पोशि 396 बाळु गहिणीनाथ बहीरवाळ हे सुरक्षा रक्षक म्हणुन नेमलेले होते. दि. 4 मे 2025 रोजी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे निवासस्थानाच्या  दुरुस्तीचे कामकाज पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षक निवासस्थानाचे मुख्य गेट उघडण्यासाठी बराच वेळ हॉर्न वाजवला परंतु ड्युटीवरील अंमलदाराने गेट उघडले नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्यांचे अंगरक्षक यांना ड्युटीवरील अंमलदार दरवाजा का उघडत नाही हे पाहण्याचे सांगीतले. त्यावेळी पोलीस अधीक्षक यांचे अंगरक्षकाने उतरुन गेट वाजवुन व आवाज दिला. त्यानंतर थोड्या वेळानंतर पोशि बहीरवाळ यांनी गेट उघडले. गेट उघडण्यासाठी एवढा वेळा का लागला याबाबत पोलीस अधीक्षकांनी  बहीरवाळ यांचेकडे चौकशी केली असता गांजाची नशा केली असल्याचे पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन पोशि बहीरवाळ यांची वैद्यकीय तपासणी केली असता वैद्यकीय तपासणी पॉझीटीव आल्याने  बाळु बहीरवाळ यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गु.र.नं. 254/2025 कलम 8 (ल), 27 छऊझड लीं प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई /396 बाळु गहिणीनाथ बहीरवाळ यांचे वर्तन हे गुन्हेगारी स्वरुपाचे असुन पोलीस खात्यास न शोभणारे आहेत. त्यांच्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असल्याने  मंगवार दि. 6 मे 2025 रोजी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत  यांनी त्यास भारतीय संविधान चे कलम 311(2) (ब) अन्वये पोलीस सेवेतुन बडतर्फ केले आहे. पोलीस हे कायद्याचा रक्षक आहेत. त्यामुळे पोलीसांच्या कोणत्याही बेकायदेशीर, गुन्हेगारी कृत्यास कदापी खपवुन घेतले जाणार नाही. कोणताही पोलीस अधिकारी किंवा अंमलदार कोणत्याही बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी आढळुन आल्यास त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँत यांनी दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!