गेवराई – बैल बुजत असल्याने मोठ्या आवाजाचे सुतळीबॉम्ब वाजवू नकोस असे म्हणत वृद्धाने तरुणाला रोखले. त्यामुळे संतापलेल्या तरुणाला त्या वृद्धाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याने तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गेवराई तालुक्यातील राहेरी येथे घडली.
तुळसीदास पाटीलबुवा पघळ (रा. राहेरी, ता. गेवराई) असे त्या मृत वृद्धाचे नाव आहे. शनिवारी रात्री ७.३० वाजता त्यांनी स्वतःकडील दोन बैल घरासमोरील मोकळ्या जागेत बांधले होते. त्यानंतर गावातील रामस्वरूप उर्फ स्वरूप लक्ष्मण फलके हा तिथे येऊन मोठ्या आवाजाचे सुतळी बॉम्ब वाजवू लागला. त्यामुळे तुळसीदास यांनी त्यास बैल बुजत आहेत, बॉम्ब फोडू नकोस असे सांगितले. मात्र, मी गावातील वाघ आहे, इथेच फटाके वाजवणार असे म्हणत रामस्वरूपने तुळसीदास यांच्या नगावर धावून जात त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि पळून गेला. मारहाणीत बेशुद्ध झालेल्या तुळसीदास यांना त्यांच्या मुलासह इतर नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी हरिदास तुळसीदास पघळ यांच्या फिर्यादीवरून रामस्वरूप याच्यावर तलवाडा पोलीस ठाण्यात खुनाच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पीएसआय बाबासाहेब भवर हे करत आहेत.















