कडा, माणिकदौंडी रोडवरील केळवंडी शिवारातील घाटाच्या पायथ्याशी केळवंडी शिवारात इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघातात एवढा भीषण होता की पुर्ण टँकर जळुन खाक झाला तर मृत व्यक्तींचा ही संपूर्ण कोळसा झाला. मृतांमध्ये एक स्त्री व एक पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान या अपघातातील चालक,चार प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर पाथर्डी येथे रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी तिसगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमीमध्ये पैठण तालुक्यातील इसारवाडी येथील लहू सांडू पवार (वय ५३), सुमन लहू पवार (४९) जगदीश जगन पवार (वय ३) कोमल जगन पवार (वय ७) यांचा समावेश असून सुरय्या बशीर खेख रा.माळीबाभूळगाव तसेच गणेश रामराव पालवे रा.पालवेवाडी तालुका पाथर्डी यांचा या अपघातात मृत्यु झाला आहे.
याबाबत अधिक समजलेली अशी की,सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास पाथर्डी-माणिकदौंडी रोडवरील केळवंडी शिवारातील घाटाच्या पायथ्याशी बाह्यवळणार औरंगाबाद येथून केरळ येथील कोचीन येथे जाणाऱ्या ( गाडी नंबर एम एच १६ सीडी ४२६६ ) या इथेनॉलच्या टँकरचा भीषण अपघात झाला. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणाने प्रसंगावधान दाखवत पेट घेतलेल्या टँकरच्या गाडीच्या काचा फोडून त्यातील चार जणांना वाचवून माणुसकीचे दर्शन घडवले.
घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पाथर्डी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलीस उपनिरीक्षक कौशल्यराम निरंजन वाघ, कॉन्स्टेबल सुहास उर्फ भोरू म्हस्के, किशोर लाड, नितीन दराडे, अल्ताफ शेख, वाहतूक शाखेचे सपोनि हमीद शेख, संजय आव्हाड,पोलीस हेड कॉन्स्टेबल देविदास खेडकर,पोलीस नाईक संभाजी आंधळे,सहाय्यक फौजदार राजू काळे तसेच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी आदींनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
घटनास्थळी अत्यंत भीतीदायक वातावरण होते दोन लहान मुलांच्या किंकाळ्यांनी बाजूच्या चहाच्या टपरीवर धामणगाव पानाचे ता. आष्टी येथील युवक अशोक किसन गाढवे याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जळत्या गाडीकडे धाव घेत टँकरची पुढची काच फोडली दोन मुले एक महिला व एका पुरुषाला बाहेर काढले. चार जणांचे प्राण वाचवणारा अशोक हा त्यांच्यासाठी देवदूत ठरला. पाथर्डी हुन धामणगाव कडे मोटरसायकलवर प्रवास करताना रस्त्यात घाटाच्या पायथ्याला चहा पिण्यासाठी तो थांबला जणू नियतीने त्याला तशी बुद्धी दिली. घटना पाहणाऱ्या हजारो नागरिकांपैकी मदतीसाठी कोणी पुढे धावले नाही. बरेच जण मोबाईल मध्ये चित्रीकरण करीत होते परंतु अशोकने हे धाडस केले व चार जणांचे प्राण वाचले.