बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : कर्तव्यात कसूर करणे शिक्षण विभागातील दोघांना चांगलेच भोवले आहे. या विभागाच्या कनिष्ठ सहाय्यक जे.जी. गोसावी यांना सीईओ अजित पवार यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. त्या बरोबरच याचप्रकरणी कनिष्ट प्रशासन अधिकारी माधव नायगावकर यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. सीईओंनी केलेल्या या कारवाईमुळे शिक्षण विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
आठ महिण्यांपासून राठोड नावाचा एक शिक्षक वैद्यकीय रजेवर होता. तसे त्या शिक्षकाने मेडीकल प्रमाणपत्रही दाखल केले होते, त्यानंतर तो रूजू होण्यास आला, यावेळी सीईओ अजित पवार यांनी त्या शिक्षकाला तपासणीसाठी मेडीकल बोर्डाकडे पाठविले, त्यानुसार त्या शिक्षकाची तपासणी करण्यात आली, त्यावर अनफिट म्हणून मेडीकल बोर्डाने अहवाल दिला. यावर त्याला रूग्णता सेवानिवृत्त करण्यात आले होते, असे असतानाही त्या शिक्षकास फिट करण्यासाठी पुन्हा मेडीकल बोर्डाकडे सीईओंची मान्यता न घेताच पाठविण्यात आले. हे सगळं प्रकरण सीईओ अजित पवार यांच्या कानावर येताच त्यांनी याप्रकरणात शिस्त मोडणार्या शिक्षण विभागाच्या कनिष्ठ सहाय्यक जे.जी. गोसावी यांना तडकाफडकी निलंबित केले आहे तसेच याच विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी माधव नायगावकर यांची एक वेतनवाढ रोखली आहे. सीईओ अजित पवार यांनी केलेल्या या कारवाईमुळे शिक्षण विभागातील अनेकांची धाबे दणाणले आहेत.















